दर दिवशी रोबॉट्स नवनवीन क्षेत्रात बाजी मारताना दिसत आहेत. वेग आणि अचूकता हे रोबॉट्सचं वैशिष्ट्य. त्यामुळे उद्योगधंदे, जोखमीची कामं, यासोबत रोबॉट्स अलीकडे संशोधनातही महत्त्वाची कामगिरी बजावतात. मात्र, कलेसारख्या सृजनशील क्षेत्रात रोबॉट्सचा संचार अवघड वाटला, तरी तिथेही रोबॉट्स हळूहळू जम बसवताना दिसत आहेत.
नेमून दिलेलं काम शिस्तीत आणि बिनचूकपणे पार पाडण्यात रोबॉट्स वाकबगार असतात. हे करत असताना ते शिकत देखील असतात. भरपूर माहिती आपल्या स्मृतीत साठवत असतात. जोडीने नवीन माहिती मिळवून तिचा अर्थ लावत असतात. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून रोबॉट्स आता चित्रकलेत तरबेज व्हायला लागले आहेत.
गेल्या आठवड्यात रोबॉट्सनी डिजिटल आर्ट केलेली पहिली गाडी जगासमोर आली. एबीबी रोबॉटिक्स या कंपनीने इल्यूसार या डिजिटल आर्ट कंपनीसोबत हा आगळा प्रयोग केला. यासाठी त्यांनी अद्वैत कोलारकरचं चित्र निवडलं. आपल्या असामान्य प्रतिभेसाठी आठ वर्षांचा अद्वैत प्रसिद्ध आहे. त्याची चित्रं आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये झळकलेली आहेत. त्याचं एक सुंदर चित्र एबीबी कंपनीने निवडून आपल्या पिक्सेल पेंट तंत्रज्ञानासाठी वापरलं. ही व्होल्क्सवॅगन गाडी रंगवताना कंपनीने इल्यूसारच्या पॅटर्नचाही उपयोग केला आहे. हे नवीन तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात रोबॉट्स गाड्यांवर विविध डिझाइन्स करून देतील.
ही झाली रोबॉट आर्टची एक गोष्ट. दरम्यान, व्हेनिसमध्ये सध्या सुरू असलेल्या प्रदर्शनात आयडा या रोबॉटने काढलेल्या चित्रांना मानाचं स्थान मिळालेलं आहे. इंजिनिअर्ड आर्टस या कंपनीने तयार केलेली आयडा रोबॉट पोट्रेटस काढण्यात पटाईत आहे. तिने काढलेली स्वत:ची पोट्रेटस या प्रदर्शनात पाहायला मिळतात. काही अशी पोट्रेटस ऑनलाइनदेखील उपलब्ध आहेत. आयडा अगदी हुबेहूब माणसासारखी दिसणारी ह्यूमनॉइड आहे. त्यामुळे तिच्यासमोर बसून पोट्रेट करून घेणे हा एक अफलातून अनुभव असतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
प्रत्यक्ष चित्र काढण्याची क्रिया रोबॉट्सच्या हातून होत असली, तरी त्यामागे असतो रोबॉट्समधला एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एआय वापरून चित्रनिर्मिती करण्याचे काम गेली पाच-सहा वर्षे सुरू आहेत. या एआय प्रणाली त्यांना दिलेल्या माहितीचा अर्थ लावतात. त्यातून शिकतात. काही वेळा त्यात माणसाच्या मेंदूतील प्रक्रियांसारख्या न्यूरल नेटवर्क तंत्रज्ञानाचा सहभाग असतो. या सगळ्यातून या प्रणाली अधिकाधिक प्रवीण होत जातात. त्यानंतर चित्र कॅनवासवर उतरवण्यासाठी रोबॉट्सच्या हातांना विशिष्ट हालचालींच्या सूचना जातात. त्यात रंगांची निवड, त्यांचं मिश्रण, ब्रशचे फटकारे कमी-जास्त करणे यातून योग्य तो परिणाम मिळवला जातो.
रोबॉट्सची चित्रकला ही अभिनव निर्मिती म्हणायची का, त्यात खरंखुरं सृजन आहे का, की केवळ आधी जमा केलेल्या माहितीचा ती वापर करते यावर वाद होऊ शकतो. पण रोबॉट्स माणसासारखं काय काय करू शकतो, याची ही एक अनोखी झलक आहे खरी!