विज्ञानविश्‍व : एलियन्सच्या शोधात…

-डॉ. मेघश्री दळवी

परग्रहावरचे चित्रविचित्र एलियन्स आपण विज्ञानकथा किंवा चित्रपटात पाहतो. प्रत्यक्षात आपल्याला अजून तरी अशा सजीवांचा पुरावा मिळालेला नाही. अलीकडे मिळालेले अनेक एक्‍झोप्लॅनेट्‌स हे सजीवसृष्टीला पोषक आहेत असा प्राथमिक अंदाज आहे. आपल्या सूर्यमालेत शनीच्या दोन चंद्रांवर, टायटन आणि एन्सेडेलसवर सजीवांचं अस्तित्व असू शकेल, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. त्याच वेळी मंगळावर आज सजीव आहेत का किंवा याआधी तिथे जीवसृष्टी होऊन गेली असेल का, हाही संशोधनाचा महत्त्वाचा विषय आहे.

त्याव्यतिरिक्‍त कित्येक शास्त्रज्ञ या अवाढव्य अंतराळात सजीव असतील का, यावर वेगवेगळे सिद्धांत वापरून ऊहापोह करत असतात. या सगळ्यामागे नक्‍की काय अपेक्षा आहे? आपल्या पृथ्वीसारखी संपन्न सजीवसृष्टी इतरत्र असावी, अशी आशा माणसाला का वाटत राहते? बुद्धिमान प्रगत सजीव नाही तर निदान एकपेशीय जीव तरी या विश्‍वात आढळतील अशा उमेदीने हा शोध का सुरू आहे? याचं कारण दडलं आहे ते विज्ञानातच. कोणतीही घटना केवळ एकदा घडलेली पाहून शास्त्रज्ञ ती मान्य करत नाहीत.

एखादा शास्त्रीय प्रयोग पुनःपुन्हा करून तेच निष्कर्ष येत असतील (रिपीटेबिलिटी) तरच तो प्रयोग ग्राह्य धरला जातो. त्याचप्रमाणे तो संपूर्ण प्रयोग त्याच पद्धतीने दुसऱ्या कोणी करून तेच निष्कर्ष येत असतील (रिप्रोड्युसीबिलिटी) तरच तो ग्राह्य धरला जातो. याच धर्तीवर कोणत्याही घटनेमागील वैज्ञानिक तर्क वा सिद्धांत मान्य व्हायला त्याला वेगवेगळ्या कसोट्यांना सामोरं जावं लागतं. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दर वेळी प्रयोगातून किंवा निरीक्षणातून सिद्ध होत असतो. आइनस्टाइनच्या सापेक्षता सिद्धांताचंसुद्धा असं परीक्षण वारंवार होत असतं.

म्हणूनच शास्त्रज्ञांना अंतराळात पृथ्वीखेरीज इतर ग्रहावर किंवा चंद्रावर निदान एका सजीवाचा पुरावा हवा आहे. आपण एकटेच आहोत का, यावरचे वेगवेगळे वैज्ञानिक तर्क तपासून पाहायला त्या पुराव्याचा प्रचंड आधार होईल. सजीवांच्या उत्पत्तीला पृथ्वीसारखं तापमान, वातावरण यांचा अचूक संयोग आवश्‍यक आहे, असं काही शास्त्रज्ञ मांडतात. त्यासाठी येल विद्यापीठाच्या हंड्रेड अर्थस प्रकल्पातून पृथ्वीसदृश ग्रहाचा शोध सुरू आहे. दुसरा सजीव नेमक्‍या कोणत्या परिस्थितीत अस्तित्वात आला यावरून ही संकल्पना योग्य आहे का, हे निश्‍चित करता येईल.

विश्‍वातलं सर्व जीवन आपल्यासारखं कार्बनवर आधारित असेलच असं नाही, तर सल्फर किंवा सिलिकॉन यांच्यावरदेखील आधारित असू शकतं असा काही शास्त्रज्ञांचा दावा आहे. एलियन सजीव मिळाला तर त्यावरून हा दावा तपासून पाहता येईल. पॅनस्पर्मिया सिद्धांतानुसार धूमकेतू, अशनी, उल्का या सजीवांचा प्रसार विश्‍वभर करत असतात, यात आपणही आलो. हा सिद्धान्त पडताळून पाहता येईल. आपल्याकडे एकपेशीय जीवांपासून उत्क्रांती होत गेली, मग एलियन जीवांची उत्क्रांती कशी झाली असेल, हाही मुद्दा ताडून पाहता येईल. म्हणूनच आपण असतो सतत एलियन्सच्या शोधात!

Leave A Reply

Your email address will not be published.