डॉ. मेघश्री दळवी
सेकंदाला एकशेऐंशी किलोमीटर, म्हणजे ताशी साडेसहा लाख किलोमीटर हा वेगाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. हा रेकॉर्ड ब्रेकिंग वेग आहे पार्कर प्रोबचा. आपली ग्रहमाला ज्या ताऱ्याभोवती मार्गक्रमण करत असते त्या आपल्या सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी म्हणून पार्कर प्रोब हे मानवरहित छोटं यान 2018 मध्ये अवकाशात सोडण्यात आलं आहे.
यूजिन पार्कर या अमेरिकन शास्त्रज्ञांनी सौर वारा आणि त्याचे परिणाम यांचा अभ्यास करून सौर वाऱ्याचं अस्तित्व पहिल्यांदा निश्चित केलं. त्यांच्या सन्मानार्थ या यानाचं नामकरण पार्कर प्रोब केलेलं आहे. आपल्या हयातीत आपलं नाव एखाद्या मोहिमेला देण्याचा सन्मान मिळवणारे पार्कर पहिले शास्त्रज्ञ आहेत.
गेल्या महिन्यात, नोव्हेंबर 21 रोजी पार्कर प्रोबने सूर्याभोवती दहावी फेरी पूर्ण केली, त्यावेळी तो सूर्यापासून केवळ पंच्याऐंशी लाख किलोमीटर अंतरावर होता. आपल्या ताऱ्याच्या इतक्या जवळ जाणारं हे पहिलंच यान आहे. या मोहिमेच्या यशाने चौऱ्याण्णव वर्षांचे पार्कर निश्चितच भारावून गेले असतील.
सूर्याच्या जवळ जाऊन तिच्या चुंबकीय आणि विद्युतक्षेत्राचं मोजमाप करणे आणि वेगवान सौर वाऱ्याचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्देश आहेत. तिथवरच्या प्रवासात प्रोब इतर डेटादेखील गोळा करत असतो. सूर्याच्या अतिशय जवळून जाणाऱ्या धूमकेतूंचं पृथ्वीवरून निरीक्षण करणं कठीण असतं.
मात्र पार्कर प्रोबने अंतराळातून घेतलेल्या सोहो धूमकेतूच्या छायाचित्राने आपल्या माहितीत महत्त्वाची भर घातली आहे. अलीकडेच शुक्राजवळून जाताना (फ्लायबाय) प्रोबने शुक्राच्या वातावरणाच्या आयनोस्फीअर थरातील आयनांबद्दल केलेलं निरीक्षणदेखील असंचं महत्त्वाचं ठरलं आहे.
आजवर प्रचंड प्रमाणात डेटा पार्कर प्रोबने पृथ्वीकडे पाठवला आहे. त्यातला काही डेटा आता सर्वांसाठी खुला केलेला आहे. त्यावरून वेगवेगळ्या संशोधनाला गती मिळत आहे आणि काही संशोधन पेपर्स प्रकाशित होऊ लागले आहेत. सूर्याच्या अगदी जवळ धूलिकण अजिबात आढळून येत नाहीत, कारण प्रखर उष्णतेने त्यांचं प्लाझ्मात रूपांतर होऊन वस्तूरूपी अस्तित्व तिथे उरत नाही हा एक निष्कर्ष,
तर सौर वाऱ्याचा वेग प्रसंगी ताशी पाच लाख किलोमीटर इतका उच्च असू शकतो, हा दुसरा निष्कर्ष पार्कर प्रोबच्या निरीक्षणातून मिळाला आहे. पण सूर्याच्या इतकं जवळ जाताना धोकेही असतात. सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत मजबूत हीट शील्ड या प्रोबवर आहे.
पण अंतराळातले सूक्ष्म धूलिकण प्रचंड वेगाने या शील्डवर आदळतात तेव्हा प्रोबची थोडीफार हानी होतेच. त्याची शीतकरण यंत्रणा दीर्घकाळ टिकाव धरू शकेल का, ही धास्तीही आहे. आणखी तीन वर्षांनी, 2025 मध्ये पार्कर प्रोब सूर्याच्या सर्वाधिक जवळ पोहोचेल आणि त्यावेळी त्याचा वेग असेल पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेकिंग- ताशी सुमारे सात लाख किलोमीटर!