विज्ञानविश्व : अवकाशातून सौर ऊर्जा

– डॉ. मेघश्री दळवी
सौर पॅनेल्स आणि सोलर फार्म्स यामधून ऊर्जा मिळवण्याचं प्रमाण झपाट्याने वाढतं आहे. एकीकडे ऊर्जेची वाढती गरज भागवणे आणि दुसरीकडे ऊर्जानिर्मितीमधून वातावरणात जाणारा कार्बन कमी करणे या दोन्ही दृष्टीने सौर ऊर्जा मोलाची आहे. या क्षेत्रात अनेक नवीन कल्पना आकार घेत आहेत, नवं तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे येत्या काळात सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढत जाणार आहे.
खरं तर सूर्याकडून पृथ्वीवर येणारी किरणं प्रचंड प्रमाणात ऊर्जा देऊ शकतात. मात्र, वातावरणातून काही ऊर्जा परावर्तित होते, तर काही शोषली जाते. उरलेली फक्त जमिनीपर्यंत पोहोचते. त्यातून ढगाळ वातावरण, पाऊस, बदलत्या ऋतूंमध्ये किरणांची बदलती दिशा, हिवाळ्यातले कमी लांबीचे दिवस, यामुळे हा ऊर्जास्रोत थोडा बेभरवशाचा होतो.
तेव्हा वातावरणाच्याही वर सौरऊर्जा निर्माण करून मग ती पृथ्वीवर पाठवणे नक्कीच फायदेशीर पडेल. कल्पना समजायला सोपी आणि उत्तम आहे. अवकाशात आपण सौर फार्म्स उभारूही शकतो. पण मिळालेली ऊर्जा पृथ्वीवर कशी पाठवायची या एका प्रश्नावर काही वर्षे संशोधन सुरू आहे. त्यातल्या कॅलटेकच्या एका प्रयोगाला भरघोस यश मिळाल्याची बातमी नुकतीच आली आहे.
कॅलटेकच्या स्पेस सोलर पॉवर प्रोजेक्टने या वर्षीच्या जानेवारीत अवकाशात सौर घट सोडले होते. सूर्याच्या प्रखर किरणांपासून ऊर्जा मिळवून ती पृथ्वीवर पाठवण्याचं या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी त्यांनी मायक्रोवेव्ह ट्रान्समिशनचा वापर केला. त्यात अवकाशात ट्रान्समिशन यंत्रणा आणि पृथ्वीवर कॅलटेक परिसरात रिसिव्हर यंत्रणा अशी रचना आहे.
हे तंत्रज्ञान वापरताना ट्रान्समिशन यंत्रणा हलकी आणि लवचिक हवी. मग ती दुमडून अवकाशात पाठवणं सोपं ठरेल. मोठ्या प्रमाणावर वापर करायचा तर ती रास्त किमतीत उपलब्ध करता आली पाहिजे. हे सारे मुद्दे लक्षात घेऊन या प्रकल्पातल्या संशोधकांनी अशी यंत्रणा तयार केली. तिने आता अवकाशात मिळवलेली सौर ऊर्जा यशस्वीपणे पृथ्वीवरच्या रिसिव्हरकडे पाठवून दाखवली आहे.
या प्रकल्पात पुढे अनेक टप्पे आहेत. छोट्या छोट्या यानांचं मिळून एक स्पेस सोलर पॉवर स्टेशन असेल. ते सूर्यप्रकाशापासून सौर ऊर्जा मिळवेल. संशोधकांच्या अभ्यासानुसार पृथ्वीवर मिळणाऱ्या सौर ऊर्जेच्या आठ पट ऊर्जा त्यातून मिळेल. नंतर ही ऊर्जा मायक्रोवेव्ह ट्रान्समिशन पद्धतीने हव्या त्या ठिकाणी पाठवता येईल.
सध्या अनेक दुर्गम भागात पारंपरिक पद्धतीने मिळवलेली ऊर्जा पोचत नाही किंवा डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या भागात सौर ऊर्जाही पुरेशी मिळू शकत नाही. अशा ठिकाणी अवकाशातून सौर ऊर्जा ग्रहण करणारा रिसिव्हर बसवून गरज पूर्ण करता येईल. अमेरिका, चीन, जपान सोबत युरोपियन देशांनीही अशा प्रकल्पांची तयारी केली आहे. उद्या पृथ्वीभोवती कदाचित सॅटलाइट्सच्या जोडीने शेकडो स्पेस सोलर पॉवर स्टेशन्स उभारलेली दिसू लागतील.





