विज्ञानिवश्‍व; पचनसंस्थेसाठी जैवसंवेदक

– मेघश्री दळवी

माणसाची पचनसंस्था तशी म्हटलं तर मजबूत आणि म्हटलं तर नाजूक असते. पचनसंस्थेचं आरोग्य हा एक गुंतागुंतीचा विषय. जर कुठे बिनसलं तर अख्ख्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य आहार आणि त्याचं पचन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पचनसंस्थेचे आजार क्‍लिष्ट आणि दीर्घकाळ त्रास देणारे असू शकतात. कधी उपचारांचा फायदा खूपच हळूहळू होतो. तर कधी कधी निदान नीट होत नाही. विशेषत: आतड्यांमध्ये प्रोब घालून तपासताना बरेच भाग नजरेला पडत नाहीत. आतड्यांमधल्या घड्या, वळया आणि बारीक बारीक कोपऱ्यामध्ये प्रोब पोहोचू शकत नाही. निदान होईपर्यंतच्या काळात रुग्णाला सतत त्रास होत राहतो, आराम मिळत नाही. मात्र, आता एका नव्या तंत्रज्ञानाने यावर उपाय होऊ शकेल अशी आशा आहे. हा उपाय म्हणजे थेट आतड्यात संवेदक (सेन्सर्स) नेऊन तिथल्या नोंदी घेणे.

मॅसॅचुसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलाजीमधले बायोइंजिनिअर डॉ. टिमोथी लू आणि चौदा तज्ज्ञ यांनी मिळून या संशोधनाची चाचणी नुकतीच घेतली. इम्बेड (इंजेस्टीबल मायक्रो बायो इलेक्‍ट्रॉनिक डिवाइस) असं नाव असलेल्या या साधनात सूक्ष्म इलेक्‍ट्रॉनिक चिप आहे आणि सोबत बायोइंजिनिरिंग केलेले, म्हणजे तांत्रिक प्रक्रियेने बदलून हवे तसे घडवलेले जीवाणू आहेत. विशिष्ट रसायनांना प्रकाशरूपी प्रतिसाद देणारे हे जीवाणू जैवसंवेदक (बायोसेन्सर्स) म्हणून
काम करतील.

आतड्यात अन्नाचं पचन होताना विविध प्रकारची रसायनं, आम्लं स्त्रवत असतात. त्यातल्या वेगवेगळ्या रसायनांचं अस्तित्व (बायोमार्कर) नोंदण्यासाठी वेगवेगळे जीवाणू खास तयार केले जातील. हे संवेदक जीवाणू आतड्यामधल्या इतर रसायनांपासून सुरक्षित राहावेत म्हणून त्यांना एक खास पातळ आवरण दिलं आहे.

इम्बेड सुमारे एक चौसेमी इतकं लहान असेल. त्यात चाळीस लाखपर्यंत संवेदक जीवाणू राहू शकतील. म्हणजे इतक्‍या विविध प्रकारच्या नोंदी आपल्याला मिळू शकतील. रुग्णाने ते गिळल्यावर अलगद आतड्यात पोचेल आणि इम्बेडमधले जीवाणू त्या त्या संबंधित रसायनांचा शोध घेतील. अशी रसायनं आढळली की हे जीवाणू विशिष्ट प्रकाश उत्सर्जित करतील. इलेक्‍ट्रॉनिक चिप या प्रकाशाचं विद्युतसंदेशात रूपांतर करतील. या होतील इम्बेडच्या नोंदी. मग निरनिराळ्या प्रकारे त्यांचं विश्‍लेषण करून बायोमार्करवरून रोगनिदान करता येईल.

यासाठी स्मार्टफोनवर एक ऍप बनवून घेतलं तर अशा साधनांचा खर्च कमी होईल आणि वापर वाढू शकेल असा या संशोधकांना विश्‍वास आहे. सजीव आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स यांचा संगम या इम्बेडमध्ये आहे. केवळ इलेक्‍ट्रॉनिक्‍स वापरण्यापेक्षा इथे जिवंत जीवाणू वापरल्याने नोंदींची अचूकता वाढते आणि साधनाचा आकारही कमी होऊ शकतो.

हे नवं संशोधन खूप आशादायक आहे. त्याची प्राण्यांवर पहिली चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. आता पुढचा टप्पा आहे अनेक चाचण्या करून इम्बेड परिपूर्ण करण्याचा. आणि मग अर्थात या चमूमधले जेफ टेबर म्हणतात तसं हे जैवसंवेदक आपल्या पचनसंस्थेबद्दल खूप नवनवी माहिती देऊ शकतील!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)