गेल्या काही दिवसांत जगात अनेक ठिकाणी विचित्र हवामानाचे परिणाम दिसले. महाराष्ट्रात अवकाळी पावसाने पिकांचा नाश झाला, आंब्याचा मोहर गळला. गारपिटीने आणखी नुकसान झालं. चमोलीतला भूस्सखलनाचा भीषण आघात झोप उडवणारा होता. अमेरिकेत टेक्सास राज्यात हिमवादळाच्या थैमानाने अनेकांना थंडी आणि अंधारात दिवस काढावे लागले. घराभोवतीचा बर्फ खरवडून वितळवून पिण्यासाठी पाणी मिळवण्याचे फोटो जागोजागी झळकले, तर सौदी अरेबियात चक्क हिमवृष्टी होऊन बर्फाने माखलेल्या उंटांचे फोटो व्हायरल झाले.
या सगळ्या विचित्र घटना हवामान बदलाशी संबंधित आहेत का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. संशोधक नेहमी अशा प्रश्नांपासून सुरुवात करून सखोल विश्लेषणाने उत्तर मिळवायचा प्रयत्न करत असतात. कार्बनब्रीफ या संस्थेने गेल्या वीस वर्षांमधल्या अशा घटनांचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. त्यात उष्णतेच्या प्रचंड लाटा आहेत, चक्रीवादळं आहेत, आणि मुसळधार पावसाने आणलेले महापूर आहेत. एकूण 355 घटनांपैकी जवळजवळ निम्म्या म्हणजे 47 टक्के घटना या उष्णतेच्या लाटेच्या आहेत. तर 15 टक्के अनपेक्षित दुष्काळ किंवा महापुराच्या आहेत. जागतिक तापमानवाढीने हवामानाची विषमता अधिकच ठळक केली आहे यात संदेह नाही.
यातल्या 69 टक्के घटना निश्चितच माणसाने ओढवून घेतलेल्या हवामान बदलामुळे आहेत असा कार्बनब्रीफच्या संशोधकांचा निष्कर्ष आहे. त्याशिवाय 9 टक्के घटनांचा संबंध माणसाने निसर्गात केलेल्या ढवळाढवळीशी लावता येण्याजोग्या आहे. याचाच अर्थ, 78 टक्के घटना निसर्गाने आपल्यावर लादलेल्या नसून आपण त्या कदाचित टाळू शकलो असतो. कार्बनब्रीफच्या 2017 च्या अभ्यासानुसार अशा घटनांचं प्रमाण 68 टक्के होतं. अवघ्या तीन वर्षांतली दहा टक्क्यांची वाढ पाहून आपण खरोखरीच कुठे आहोत, आणि आणखी किती दु:खद संकटं समोर वाढून ठेवली आहेत याची दाहक जाणीव होते.
टोकाच्या हवामानाचा अभ्यास करणारी एक नवी शाखा आता उदयाला आली आहे. खरं तर हा अभ्यास आता अनिवार्य आहे. असे आघात आपण टाळू शकतो का, हा एक दृष्टीकोन यामागे असला, तरी त्यांचा परिणाम कमी करता यावा आणि त्यांच्यासाठी तयारीत राहता यावं हाही विचार आहे.
क्लायमेट सिग्नल्स ही संस्थादेखील या घटनांकडे धोक्यांची सूचना या दृष्टीने पाहत असते. हिवाळी वादळांची संख्या वाढत आहे याकडे तिने अलिकडे लक्ष वेधलं आहे. आर्क्टिक प्रदेशातला वितळता बर्फ, सोबत येणारं जास्तीची आर्द्रता, आणि पावसाचा वाढता मारा याने अशी अधिक वादळं येणार आहेत आणि त्याचा सर्वाधिक फटका समाजातल्या दुर्लक्षित, वंचित घटकांना बसणार आहे. विचित्र हवामानाच्या घटनांचे आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक, आणि मानसिक परिणाम दूरगामी आहेत, आपल्याला अजून त्याचा अंदाजही आलेला नाही, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांमधल्या घटनांनी थोडी तरी जाग येईल अशी आशा आहे.