शाळा, तुकड्यांच्या अनुदान प्रस्तावात त्रुटींचा पाऊस

प्रस्ताव सादर करण्यासाठी विभागनिहाय डेडलाइन

पुणे – राज्यातील कायम विनाअनुदानित तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या व विना अनुदानित तत्वावर परवानगी दिलेल्या प्राथमिक शाळा व तुकड्यांच्या अनुदानाच्या प्रस्तावात जास्त त्रुटीच आढळून आल्या आहेत. या शाळांना त्रुटीची पूर्तता करून मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतही देण्यात आली आहे.

शाळा व तुकड्यांचे मूल्यांकन झालेल्या प्रस्तावांची तपासणी करण्यात आली. यात काही शाळांनी आवश्‍यक ती कागदपत्रेच सादर केली नाही. माहितीही परिपूर्ण भरलेली नाही. विद्यार्थी संख्या, रोस्टर, पटसंसख्येनुसार शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या, सोयी – सुविधा आदींची माहिती पुराव्यासह प्रस्तावात नमूद करणे आवश्‍यक असते. मात्र, काही शाळांकडून त्याची पूर्तताच करण्यात आलेली दिसत नाही.

प्रस्तावात ज्या त्रुटी असतील त्या त्रुटींची पूर्तता होत असल्याची खात्री करुन त्रुटीपूर्ततेसह वेळापत्रकानुसार संबंधित जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी, लिपिक, शाळेतील मुख्याध्यापक, कार्यालयातील विज्ञान सल्लागार यांनी समक्ष प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक सुनील चौहान यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत.

 

नागपूर विभागातील शाळांचे प्रस्ताव दि. 6 मे रोजी दाखल करावेत. अमरावतीसाठी दि. 8 मे, कोल्हापूरसाठी दि. 10 मे, औरंगाबादमधील शाळांसाठी दि. 13 मे, लातूरसाठी दि. 15 मे, मुंबईसाठी दि. 17 मे, नाशिकमधील शाळांसाठी दि. 20 मे, पुणे विभागासाठी दि. 22 मे याप्रमाणे प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर कोणाचेही प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाहीत व त्यावर कार्यवाही करण्यात येणार नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.