पुणे !शाळांनो, मनमानी थांबवा….

* फी वसुली : संतप्त पालकांचे आंदोलन
* राज्य शासन दादच देत नसल्याचा आरोप

 करोना-लॉकडाऊनमुळे पालक वर्ग आर्थिक संकटात आहे. त्यामुळे खासगी शाळांनी मनमानी पद्धतीने सुरू केलेला फी वसुलीचा तगादा थांबवावा. फीमध्ये सवलत द्यावी, या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन केले. मागण्यांचे पोस्टर्स झळकावत घोषणाबाजी करत या धोरणाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला.

माजी आमदार योगेश टिळेकर व सावित्री सन्मान फाउंडेशनच्या संस्थापक सोनल कोद्रे, सहसचिव वर्षा ऊनउणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात दादा कोद्रे, धीरज गेडाम, गणेश पावसे, आनंद भालेराव, पंकज मेमाणे, दत्ता ठाणगे, भूपाल अगरवाल आदींसह इतर पालकांनी सहभाग घेतला.

करोनामुळे शाळा बंद आहेत. शाळांनी ऑनलाइन शिक्षणासाठी 100 टक्के फी वसुली सुरू ठेवली आहे. फी भरली नाही म्हणून काही शाळांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवले. काहींना शाळा सोडल्याचे दाखलेच पाठवून दिले. यावर पालकांनी शासनाकडे अनेकदा निवेदने पाठवली. मात्र, त्याला फारशी दाद मिळालीच नाही.

शाळांनी 30 टक्के फी कपात करावी, जेवढा खर्च तेवढीच फी आकारावी, शाळांचे ऑडिट करावे, सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे, एकाही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवू नये, शाळेतून कोणालाही काढू नये, पालक-शिक्षक संघटना स्थापून त्यांना अधिकार द्यावेत आदी मागण्या पालकांनी केल्या. यावेळी शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांना शिष्टमंडळाने निवेदन देऊन चर्चा केली. त्यावर उकिरडे यांनी प्रश्‍न सोडवण्याबाबत आश्‍वासन दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.