पुणे – राज्य शासनाच्या निर्णयानुसार अनुदास पात्र व मंजूर शाळा, तुकड्यांची शालेय शिक्षण विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या विशेष पथकामार्फत तपासणी होणार आहे.
13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार मुल्यांकनात पात्र खासगी शाळा अनुदानास पात्र घोषित करणे व 20 टक्के अनुदान सुरू असलेल्या शाळांना वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रीमंडळाच्या 14 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत शाळांना प्रत्यक्ष अनुदान देण्यापूर्वी शिक्षण आयुक्तांकडून शासनास सादर झालेल्या प्रस्तावाची शालेय शिक्षण विभागामार्फत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तपासणीत पात्र शाळांना अनुदान देण्यात येणार असल्याने संबंधित शाळांची तपासणी होणार आहे. तपासणी पथकात सहसचिव इ. मु. काझी, कक्ष अधिकारी ल. वि. सावंत, सहायक कक्ष अधिकारी वि. ग. आव्हाड, संबंधित जिल्ह्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. तपासणी पथक संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात कधी येणार याची पूर्वकल्पना दोन दिवस आधी देण्यात येणार आहे.
शाळांची सर्व माहिती सरल प्रणालीवर भरली आहे का, बायोमेट्रिक प्रणाली, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, प्रयोग शाळा, दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल, संच मान्यता आदींची तपासणी होणार आहे.