शाळांचं ठरलं, पण महाविद्यालये कधी सुरू होणार?

उद्या चर्चा : दोन दिवसांत निर्णय, विद्यार्थ्यांचे लक्ष

पुणे – राज्य सरकारने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालये कधी सुरू होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात येत्या सोमवारी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे लवकरच महाविद्यालये सुरू होण्याची चिन्हे आहेत.

 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठे, महाविद्यालये सुरू करण्याबाबतची कार्यपद्धती दि.5 नोव्हेंबरला जाहीर केली. त्यानुसार करोना रोखण्यासाठी सर्व नियम पाळून विद्यापीठे आणि महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत.

 

करोनामुळे मार्चपासून महाविद्यालये, विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्था बंद आहेत. मात्र, आता राज्य सरकारकडून शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे महाविद्यालयांबाबत निर्णय का घेतला जात नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

 

करोनाची स्थिती पाहता महाविद्यालये सुरू करण्याबाबत शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांशी सोमवारी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल.

डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.