विद्यार्थी, पालक हैराण : शासन आदेशाला केराची टोपली
पुणे – करोना प्रादुर्भाव वाढत असताना पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. या कठीण प्रसंगी शाळांनी पालकांकडे शुल्क वसूलीसाठी तगादा सुरूच ठेवला आहे. काही शाळांनी शुल्कवाढ लागू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे विद्यार्थी, पालकांपुढे मोठे संकट उभे आहे.
करोनामुळे लॉकडाऊनही सतत वाढवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मार्चपासून शाळाही बंद आहेत. मागील शैक्षणिक वर्षाची फी विद्यार्थ्यांकडे थकली आहे. पालक अडचणीत असल्याने सध्या शाळांनी फी वसूल करू नये, असे आदेश शासनाने शाळांना वारंवार बजावले आहेत. मात्र, शाळांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली.
शाळांनी ई-मेल, एसएमएस, व्हॉट्स ऍप, झूम या माध्यमातून पालकांना फी भरण्याबाबतच्या सूचना देण्याचा धडाका कायम ठेवला आहे. पालक, संघटना यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे शाळांविरुद्ध तक्रारीही केल्या आहेत. मात्र, अद्याप शाळांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.गणपत मोरे यांनी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित सर्व माध्यम, व्यवस्थापन, बोर्डांच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना पुन्हा आदेश पाठवले आहेत. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात कोणतीही फी वाढ करू नये, शिल्लक फी एकदाच न घेता मासिक, त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय द्यावा, ऑनलाइन फी भरण्याचा पर्याय द्यावा, काही शैक्षणिक सुविधांचा वापर न झाल्यास त्याबाबतचा खर्च कमी करावा, असे आदेशात नमूद केले आहे.
शाळा सक्तीने नियमित व वाढीव फी वसूल करत असल्याबाबत पुणे व पिंपरी-चिंचवड मधील सहा शाळांविरुद्ध पालक, संघटना यांनी लेखी व फोनद्वारे तक्रारी नोंदविल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात तपासणी करून सत्यस्थिती जाणून घेण्यात येणार आहे. यात दोषी आढळणाऱ्या शाळांवर शासनाच्या नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
– डॉ.गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे