शाळा, अंगणवाड्या “इको फ्रेंडली’

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून होणार विविध विकास कामे

पुणे – महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा व अंगणवाड्यांचा भौतिक विकास करून त्यांचा शैक्षणिक उपयोग होणार आहे. सुंदर परिसरात शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होण्यासही मदत होणार आहे. यातूनच जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेण्याची मानसिकता पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी हातभार लागणार आहे.

राज्यातील बहुतांशी विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेत आहेत. त्यांच्यात शिक्षणाबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळांचा परिसरही सुंदर असणे आवश्‍यक आहे. स्वच्छ, सुंदर व हिरवाईने नटलेल्या परिसरात शिकणे व शिकवणे या दोन्ही प्रक्रिया आनंददायी आहेत.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्‍यातील जैतादेही गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गटविकास अधिकारी, पंचायत समिती व शिक्षकांनी मनरेगाच्या माध्यमातून शाळांचा भौतिक विकास करण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविला. जैतादेही पॅटर्नच्या धर्तीवर मनरेगा योजनेच्या माध्यमातून राज्यातील इतरही शाळांचा भौतिक विकास करणे शक्‍य होणार आहे. अमरावती जिल्ह्याने यात पुढाकार घेतला असून 40 टक्‍के शाळांचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर प्राप्त झाले आहेत.

इतर जिल्ह्यांनीसुद्धा अशीच कामगिरी बजावल्यास महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक दर्जा आणि गुणवत्तेमध्ये नक्‍कीच वाढ होण्यास मदत होणार आहे. मनरेगाअंतर्गत शाळेसाठी किचन शेड उभारणे, रेन वॉटर हार्वेस्टिंगची संरचना करणे, शोषखड्डा निर्माण करणे, खेळाचे मैदान विकसित करणे, संरक्षक भिंत बांधणे, वृक्ष लागवड करणे, पेविंग ब्लॉक बसविणे, गुणवत्तापूर्ण रस्ते उभारणे, गांडूळ खत प्रकल्प तयार करणे, बोअरवेल पुनर्भरणाची व्यवस्था करणे आदी कामे करता येणार आहेत. मनरेगा योजनेच्या माध्यमातून सर्व कामे करता येणार असल्याने शाळांना काही खर्च करायचा नाही.

मनरेगा कृती आराखड्यात कामांचा समावेश
शाळेच्या मुख्याध्यापकांनी, अंगणवाडीताईंनी आपल्या परिसरात उपलब्ध जागेनुसार आवश्‍यक कामांची यादी तयार करून ग्रामपंचायतीला द्यावी. ग्रामसेवक, रोजगार सेवक यांची या कामांचा समावेश 2021-22 च्या मनरेगा कृती आराखड्यात करावा. सर्व कामे कृती आराखड्यात समाविष्ट झाल्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी खात्री करावी. पंचायत समितीच्या स्थायी समितीची मंजूरी घ्यावी, असे आदेश शासनाच्या रोजगार हमी योजनेचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी दिले.

शालेय वयातच सेंद्रिय खतांची ओळख
गांडूळ खत तयार केल्याने ते शाळेच्या परिसरातील झाडांना व परसबागेला वापरता येणार आहे. यातून येणारी फळे, पिके, भाज्या या शुद्ध व रासायनिक खतमुक्‍त असणार आहेत. शालेय वयातच विद्यार्थ्यांनाही सेंद्रिय खतांची ओळख होणार आहे. शाळेच्या उपलब्ध करून दिलेल्या जमिनीवर फळबाग, बांबू लागवड, पाणलोट अशा प्रकारची कामे घेता येणार आहेत. यातून शाळांना दरवर्षी ठराविक उत्पन्नही मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.