पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये राज्यात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्य सरकारने सर्व गर्दीचे सार्वजनिक क्षेत्र येत्या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परमिट रूम आणि बियर बारही बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, दारूची (वाईन शॉप) दुकाने सुरूच राहणार असल्याने सर्वाधिक गर्दी आता या ठिकाणी वाढली आहे. दारूची दुकानेच सुरू का? नागरिकांच्या जीवापेक्षा महसूल प्रिय झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
“करोना’ हा संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, परदेश यात्रा करू नये. लांबचा प्रवास टाळावा, अशा सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारने तर शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्व धार्मिक व राजकीय कार्यक्रम व जत्रा उत्सव असे अनेक कार्यक्रम येत्या 31 मार्चपर्यंत रद्द केले आहेत. तन अनेकांनी लग्न सोहळेदेखील पुढे ढकलले आहेत. रेल्वेने काही लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द केल्या आहेत. परंतु दारु विक्रीची दुकाने सुरुच आहेत.