- राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा
पिंपरी – करोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील महापालिकेच्या शाळा मंगळवारपासून (दि. 15) ऑनलाइन सुरू होणार आहेत. तर, काही खासगी शाळा सोमवारपासूनच (दि. 14) सुरू होणार आहेत. अवघे काही दिवस शिल्लक असतानाही शाळा कशा पद्धतीने सुरू कराव्यात, यासाठी राज्य सरकारचे नियम आणि मार्गदर्शक सूचना अद्याप शालेय शिक्षण विभागाकडून आलेल्या नाही. त्यामुळे महापालिका शिक्षण विभाग शासनाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहे.
गेल्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष (2020-21) सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. यंदा करोनाचा संसर्ग कायम आहे. अद्याप राज्य सरकारने आणि शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केलेले नाही. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मंगळवारपासून सुरू होतील, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार स्थानिक पातळीवर कार्यवाही केली जाणार आहे.
खासगी शाळांकडून आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार विषयवार आखणी करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक वर्गनिहाय व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहे. गतवर्षी बऱ्याच खासगी शाळांनी व्हॉट्सअप ग्रुप, झुम, गुगल मीट ऍप आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले होते. यंदाही त्याच पद्धतीने तयारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार व्हिडिओ, ऑडिओ आणि लिखित संदेशाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे.
महापालिका शाळांचाही ‘सेटअप’ तयार
महापालिका शाळांचा गतवर्षी ऑनलाइन शिक्षणासाठी “सेटअप’ तयार करण्यात आला आहे. त्यानुसार यंदाही वर्गनिहाय व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केले आहे. तसेच, शिक्षकांनी ब्लॉग तयार केले आहेत. त्याच्या माध्यमातून अध्ययन करण्यात सुविधा निर्माण झाली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी त्यानुसार शिक्षण सुरू केले जाईल.
राज्य सरकारचे नियम व मार्गदर्शक सूचना अद्याप शालेय शिक्षण विभागाकडून आलेल्या नाही. त्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आमच्याकडे ऑनलाइन शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक ‘ सेटअप’ तयार आहे.
– ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग