पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळा विभागामार्फत दूरशिक्षण (डिस्टन्स एज्युकेशन) अभ्यासक्रमाच्या पदवीच्या बीए आणि बीकॉम या अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया उद्यापासून (दि.24) सुरू होत आहे. एमए आणि एमकॉम या अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
दूरस्थ शिक्षणपद्धतीने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. त्यासाठी दि. 24 जुलै ते 31 ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली आहे. दि. 24 जुलै रोजी दुपारी तीनपासून प्रवेशासाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यातील निवडक महाविद्यालयातील मुक्त अध्ययन प्रशाळेच्या अभ्यास केंद्रावर प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घ्यावयाचे असून प्रवेश अर्ज त्यांनी निवडलेल्या अभ्यास केंद्रावर जाऊन सध्याच्या परिस्थितीत जाऊन सादर करू नयेत. प्रवेश अर्ज सादर करण्यासंदर्भातील सूचना नंतर जाहीर करण्यात येतील, अशी माहिती विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेचे संचालक डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली. प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती मुक्त अध्ययन प्रशाळेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवेशासाठी पुढील संकेतस्थळ : http://unipune.ac.in/sol/
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
1. स्वत:चा फोटो
2. सहीचा नमुना
3. आधार कार्ड
4. गुणपत्रिका
5. स्थलांतर प्रमाणपत्र