शाळेला सुटी; पालक, विद्यार्थ्यांची धावपळ

पुणे – शहरातील पूरसदृश्‍य स्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरुवारी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. त्यामुळे बहुतांश शाळा व महाविद्यालये बंद होती. परंतु, सुटीचे आदेश सकाळीच काढण्यात आल्याने काही शाळा, पालक व विद्यार्थ्यांची धावपळ उडाली.

शहर व जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर केली. तसेच शहरासह हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्‍यांतही शाळांना सुटी होती. दरम्यान, तातडीने सुटी जाहीर केल्याने सर्व शाळा, महाविद्यालय पालकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती प्राप्त होत होती. परंतु, काही पालकांना सुटी असल्याची कल्पना नव्हती, असेही चित्र पाहावयास मिळाले.

बहुतांश शाळेच्या बस, व्हॅन, रिक्षाकाकांनी पालकांना फोनद्वारे पावसामुळे शाळा बंद असल्याचे कळविले. तर काही पालकांना सुटी असल्याचे माहीत नसल्याने ते नेहमीप्रमाणे मुलांना घेऊन शाळेत आले होते.

शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आज शाळा बंद असल्याचे सूचनाफलक लावण्यात आले होते. त्यामुळे त्यांना परत घरी जावे लागले. दरम्यान, महाविद्यालयांना सुटी असल्याने विद्यापीठाचे कार्यालयही गुरुवारी बंद होते. दरम्यान, काही पूर्वप्राथमिकच्या शाळा सुरू होत्या. परंतु, सुटीची माहिती मिळताच शाळांनी विद्यार्थ्यांना घरी सोडले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.