शाळकरी मुलीचे अपहरण करून अत्याचार

जखमी अवस्थेत सोडून नराधमाने केले पलायन

कोपरगाव  – देशभरात महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ होत असून, दिल्लीतील निर्भया व हैदराबाद येथील डॉक्‍टरवरील अत्याचारांच्या घटनांनंतर देशातील वातावरण ढवळून निघाले. या घटनांनंतरही अत्याचाराच्या घटना उघडकीस येतच आहेत. कोपरगाव तालुक्‍यातील वेळापूर येथील चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे शुक्रवारी सायंकाळी अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचारानंतर नराधमाने पीडित मुलीला जखमी अवस्थेत सोडून पलायन केले. याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी चौथीत शिक्षण घेत आहे. ती शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घराकडे जात होती. यावेळी आरोपीने सदर मुलीस मी तुझ्या वडिलांचा भाऊ आहे. तुला घरी घेऊन जाण्यासाठी त्यांनी मला पाठवले आहे, असे सांगून पीडितेस गाडीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपीने पीडितेस शहजापूर-कोळगाव रस्त्याशेजारील कालव्या लगतच्या निर्मनुष्य वस्तीत असलेल्या बंद खोलीत लैंगिक अत्याचार केले. आरोपीने यावेळी पीडितेस जबर मारहाण केली. त्यात ती जबर जखमी झाली.

दरम्यान मुलगी शाळा सुटल्यावर घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलीस व नातेवाईकांनी शोधाशोध केली असता, एका ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एका अज्ञात व्यक्तीने सदर मुलीस मोटार सायकलवर बसवून घेऊन जात असल्याचे दिसले. त्यामुळे सदर मुलीचे अपहरण झाल्याची खात्री पटली. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तीन पथके कोपरगावच्या दिशेने पाठवून दिले. कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चौथे पथक आरोपीसह मुलीचा शोध घेण्यासाठी तालुका व परिसरात रवाना झाले. पोलीस अधिकाऱ्यांसह 34 कर्मचाऱ्यांचा ताफा आरोपीच्या मागावर होता. रात्रभर पोलीस व नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र मुलीचा शोध लागला नाही. पहाटेच्या दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक, दोन गावाचे पोलीस पाटील यांना एक मोटार सायकल बेवारस अवस्थेत मिळून आली. दरम्यान जखमी अवस्थेत पीडित मुलीला आरोपीने सुरेगाव येथील कालव्याजवळ एका अज्ञात व्यक्तीच्या मोटार सायकलवर बसवून सोडून दिले. पीडित मुलीने त्यानंतर नातेवाईकाचे घर गाठले. त्यानंतर पुढील धक्कादायक घटना उघडकीस आली.

पोलिसांनी पीडित मुलगी व सापडलेली दुचाकीची सखोल चौकशी केली असता, दुचाकी शहजापूर येथील गणेश गोपीनाथ शिंदे यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. सदर दुचाकी उसाचे वाढे आणण्यासाठी पाथर्डी येथील ऊसतोड कामगार अमोल बाबुराव निमसे घेऊन गेल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी अधिक तपास केला असता, कोळगाव पाट शेजारील खोलीत नेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आली आहे. मात्र आरोपी फरार झाला आहे. दरम्यान पीडितेस कोपरगावातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिची वैद्यकीय तपासणी करून तिच्यावर अत्याचार झाला असून, शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या.

या घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रिया काळे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक अनिल कटके, राकेश माणगावकर यांनी घटनास्थळी भेटी देऊन पंचनामा करून तपास सुरू केला आहे. पीडितेस पुढील उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. तसेच गाडी मालक, खोली मालक व त्याला सहकार्य करणाऱ्या इतरांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.