पुणे – करोनामुळे सध्या शाळांकडून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. काही विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळे शाळांकडून त्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबविण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याची पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून शाळांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे बहुसंख्य पालकांनी शाळांची फी भरलेली नाही. मात्र,शाळांकडून अद्यापही तगादा सुरूच आहे.
पालकांनी शाळा व्यवस्थापनांशी बोलून फी भरण्यासाठी सवलत मिळविण्याबाबत स्वतंत्रपणे चर्चा करणेही गरजेचे आहे. केवळ फी भरली नाही व अन्य कारणांमध्ये विद्यार्थ्यांची काही चूक नाही. त्यामुळे त्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबणार नाही याची शाळांनी दक्षता घेतलीच पाहिजे.
आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.
शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे योग्य नाही. नियमानुसार ऑनलाइन शिक्षण सुरु न केल्यास शाळांवर प्रशासकीय कारवाई करावी लागणार आहे.
– डॉ. गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी