हवेली तालुक्यात अनेक नामांकित संस्थेच्या शाळा, महाविद्यालये आहेत. त्यांनी गुणवत्तेचा दर्जाही राखला आहे. मात्र काही शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी वसुलीचे प्रकार सुरू असून, यातून काही संस्थाचालक लाखोंचा नफा कमावताना दिसू लागले आहेत.
तालुक्यातील शाळांमधील चालू असलेल्या या प्रकाराबाबत सध्या शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू झाली आहे. या प्रकारांना आळा बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन होऊन देखील फीबाबत घेतलेल्या अनेक निर्णयांची माहिती पालकांना नसल्याचे उघड होऊ लागले आहे. कागदोपत्री पालकसभा दाखवण्यात अनेक शाळा प्रशासन पुढे असल्याचे दिसत आहे. अनुदानित शाळांमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय काही ठिकाणी अनुदानित तुकड्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी वसूल करण्यात येत आहे, तर विनाअनुदानित तुकड्यांबाबत फी घेण्याबाबत कोणतीही बंधने नसल्याचे आढळून आले आहे.
शालेय फीमध्ये दरवर्षी होणारी वाढ पालकांच्या जागृतीमुळे रोखली जाऊ शकते. अनुदानित शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत असतानासुद्धा फी द्यावी लागते, हे दुर्दैव त्यामुळे बंद होऊ शकते. विनाअनुदानित तुकड्यांत फी आकारण्याबाबत शिक्षण विभागाची परवानगी घेऊन आणि पालकांच्या संमतीने निर्णय घेतले जाऊ शकतात; पण ते विद्यार्थी हिताचे असेल पाहिजेत. मात्र या सर्व बाबी विद्यार्थी-पालक यांच्या जागृतीमुळे सकारात्मक होऊ शकतात. यासाठी दरवर्षी वाढणारी फी आवश्यक आहे की अनावश्यक, असा प्रश्न जरी शाळा व्यवस्थापनाला विचारला तरी याबाबतचे नियंत्रण पालकांचे राहील. याशिवाय शिक्षण विभागाने वेळोवेळी शाळांना भेटी देताना फीबाबत चौकशी केली, तर अनेक अनुचित प्रकारांना आळा बसू शकतो.