शालेय शिक्षणमंत्र्यानी टोचले अधिकाऱ्यांचे कान

प्रकरणे प्रलंबित ठेवू नये, कामाचा नियमित निपटारा करण्याचे आदेश

 

पुणे – राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची प्रकरणे प्रलंबित ठेवू नये, कामाचा नियमित निपटारा करावा, थेट माझ्यापर्यंत तक्रारी येतील अशी कामे करू नका, असे म्हणत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिकाऱ्यांचे पुन्हा कान टोचले.

शालेय शिक्षणच्या विविध विषयांबाबत पुण्यात दोन दिवसीय आढावा बैठक झाली. अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही बैठकीत मार्गदर्शन केले. विविध प्रकल्पांचे सादरीकरणही करण्यात आले.

राज्यातील विविध विभागांचे शिक्षण संचालक, सहसंचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, महापालिका व नगरपालिकांचे प्रशासन अधिकारी, विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, शिक्षण निरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीच्या तयारीवर मोठा खर्चही झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अधिकाऱ्यांसाठी सर्व आवश्‍यक त्या “सोयी’ची पूर्तताही केली होती. शिक्षण आयुक्‍त कार्यालय, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालय यांच्यातर्फे विविध विषयांचा समावेश असलेल्या विषयपत्रिकाही तयार केल्या होत्या. त्यावर योग्य ते मार्गदर्शन करून अधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. अधिकाऱ्यांच्या शंकाचे निराकरणही करण्याचा प्रयत्न झाला.

करोनामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाची घडी विस्कटली आहे. राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी व जलद कामे मार्गी लावण्यासाठी शिक्षणमत्र्यांनी अधिकाऱ्यांचे ब्रेन वॉश केले.”व्हिजन-2025’चा ऍक्‍शन प्लॅन तयार झाला असून टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणीचे नियोजन होणार आहे. शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी अधिकाऱ्यांच्या अनेकदा बैठका घेऊन वेळोवेळी आदेश दिले आहेत. आता पुन्हा अधिकाऱ्यांना कामकाजात बदल करण्याचे आदेश दिले.

अधिकाऱ्यांकडून चांगल्या कृतीची अपेक्षा

शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने बैठका घेतल्या जातात. गेल्या मार्चपासून करोनाचे संकट असल्याने अनेकदा अधिकाऱ्यांच्या ऑनलाइनच बैठका घेण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातून फारशी फलनिष्पत्ती झाली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष बैठक घेण्याची गरज भासली होती. याच्या निमित्ताने अधिकाऱ्यांची “सहल’च होत असते. बऱ्याशा अधिकाऱ्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणांना भेटण्याचा, गप्पा मारण्याचा, फोटोसेशन करण्याचाही आनंद लुटला. नुसत्याच आढावा बैठका घेऊन मेळावे भरवून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून चांगली कृती होणे आवश्‍यक आहे, असे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.