पुणे – राज्य शासनाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या कंत्राटीतत्वाने नियुक्त्या करण्याबाबतच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र राज्य संस्थाचालक महामंडळ, मुख्याध्यापक महासंघ आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांच्या वतीने शाळा बंद आंदोलन केले. राज्यभरात त्याला सर्वच शाळांनी प्रतिसाद दिला.
राज्यभरातील जवळपास 18 ते 20 हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी कामकाज बंद ठेवून निषेध व्यक्त केला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे राज्य सचिव शिवाजी खांडेकर यांनी दिली. शिक्षणमंत्र्यांनी हा अन्यायकारक शासनादेश तातडीने मागे घ्यावा अन्यथा भविष्यात संस्थाचालक व मुख्याध्यापक महासंघाच्या सोबतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खांडेकर यांनी दिला.
राज्यातील शिक्षक व पदवीधर आमदार, शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी हे धोरण रद्द करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने पालक या शासन निर्णयाविरोधात आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातदेखील या आंदोलनास प्रतिसाद मिळाला. शहरातील शाळा करोनामुळे बंद असल्या तरी शालेय कार्यालयातील सुरू असणारे प्रशासकीय कामकाज मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बंद ठेवले होते, अशी माहिती पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे उपाध्यक्ष प्रसन्न कोतूळकर यांनी दिली.