अकोले (प्रतिनिधी) -अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे मुबंईहून आलेल्या शिक्षक व त्याच्या कुटुंबास खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यामुळे वेळेचा सदुपयोग कसा करायचा, हा विचार मनात आल्याने लिंगदेव भूमिपुत्र सुनील जिजाबा फापाळे, त्यांचे कुटुंब, पुतणे व सहकाऱ्यांनी न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज परिसर स्वच्छ केला. शाळेच्या आवारात असणाऱ्या झाडांमध्ये असलेले गवत साफ करून त्यांना पाणी दिले. त्यामुळे शाळेची इमारत चकाचक झाली आहे.
आपण याच शाळेत शिकलो. या शाळेचे काहीतरी देणे लागतो, म्हणून आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग चांगल्या कामासाठी करावा, असा विचार आमच्या मनात आला. म्हणून आम्ही हे काम हाती घेतले आहे. आम्ही जोपर्यंत शाळेत आहोत, तोपर्यंत आम्ही शाळा साफ करून शाळेचा चेहरा मोहरा बदलू, असे सुनील फापाळे यांनी सांगितले. आम्ही जसा शाळेचा परिसर स्वच्छ ठेवून निगा राखली, तशीच प्रत्येक ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांचा पुतण्या आवेश फापाळे यांनी मोलाची मदत केली व तशी संकल्पना आवेश याने सुचविली, असे सुनील फापाळे यांनी सांगितले. याकामी आवेश दिलीप फापाळे, ओमी आवेश फापाळे, आविष्कार सुनील फापाळे, सिद्धेश सुनील फापाळे यांची मोलाची मदत लाभली.