वाहतूकदारांकडून सूतोवाच : खर्च वाढल्याचे कारण
पुणे – करोना पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतुकीमध्ये बदल होत आहेत. याला शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी वाहनेदेखील अपवाद नाहीत. येत्या काळात एका वाहनात निम्म्याच जणांना प्रवास करता येणार आहे. याशिवाय, वाढत्या पेट्रोल आणि डिझेल दरामुळे वाहतुकीसाठी पालकांना अधिकचा भार पेलावा लागणार आहे. याबाबत वाहतूकदारांनीही या शैक्षणिक वर्षात स्कूल बस, व्हॅन, रिक्षाच्या दरामध्ये वाढ होण्याचे सूतोवाच केले आहे.
लॉकडाऊनमुळे यंदा शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या. तर, जुलैपासून टप्प्याटप्प्याने सुरू होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पालकांना सध्या मुलांना लॅपटॉप, मोबाइल, इंटरनेट आदी “ई-शैक्षणिक साहित्याची’ जुळवाजुळव करावी लागत आहे. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर पालकांना स्कूलबसच्या खर्चाचा बोजा सहन करावा लागणार आहे.
सध्या सोशल डिस्टन्सिंगच्या अनुषंगाने एका वाहनामध्ये निम्म्या नागरिकांना प्रवास करता येणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूकदारांनी डिझेल वाढ, कर, वाहनांची देखभाल आदी कारणांमुळे दरवाढीची शक्यता वर्तवली.
मागील काही दिवसांपासून डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. याशिवाय यंदा कमी विद्यार्थ्यांना प्रवास करता येणार आहे. विद्यार्थी 50 टक्के असतील, तरी मात्र वाहतूकदाराला 100 टक्के खर्च येणार आहे. त्यामुळे वाहतूकदारांवर येणाऱ्या आर्थिक ताणानुसार विद्यार्थी वाहतुकीच्या दरामध्ये वाढ होऊ शकते.
– राजेंद्र जुनवणे, उपाध्यक्ष, पुणे बस ओनर्स असोसिएशन