प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 -दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 16 वा शिष्यवृत्ती प्रदान व दिशा परिवार आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान समारंभ रविवारी (दि.18) सकाळी 10 वाजता घोले रस्ता येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.
पुण्यातील दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या 15 वर्षांपासून विविध नावीन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील गरजू आणि गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून दिली जाते. यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होतो. यंदाही दानशूर व्यक्तींच्याच हस्ते विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश देण्यात येणार आहेत, अशी माहिती दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी दिली आहे.
या समारंभाला “एमएमसीसी’चे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, डॉ. विक्रम गायकवाड, ज्येष्ठ संपादक संजय आवटे हे
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतच दिशा परिवार आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारांनी मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. यात ऍड. प्रताप परदेशी, शिरीष मोहिते यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या समारंभास दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माणिकराव गोते, सचिव डॉ. मोहन भोई, खजिनदार अरुण कुलकर्णी, विश्वस्त विवेक अगरवाल, कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, महेंद्र खंडेलवाल, पौर्णिमा जानोरकर, नंदकिशोर रोजेकर, नवीन मेणकर, निखील पडवळ आदी उपस्थित राहणार आहेत. करोनामुळे मागील दोन वर्षांत हा कार्यक्रम झाला नव्हता.
यंदा दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विशेष पुढाकाराने हा शानदार समारंभ होणार आहे, अशी माहिती दिशा परिवारच्या वतीने देण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे स्थळ, वेळ ः पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता. सकाळी 10 वाजता