शिष्यवृत्ती परीक्षाही रद्द होण्याची शक्यता

पुणे : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 23 मे रोजी घेण्यात येणारी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षाही रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येवू लागली आहे.

सीबीएसई, सीआयएससीई बोर्डाने इयत्ता दहावीच्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्र बोर्डाची दहावीची जूनमध्ये होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. एमपीएससी, नेट सह इतर परीक्षा लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारीत शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असते.
यंदा ही परीक्षा 25 एप्रिल रोजी होणार होती; परंतु करोनाच्या संकटामुळे राज्यातील अनेक शहरे आणि ग्रामीण भागातही परिस्थिती बिघडल्याने ही परीक्षा 23 मे पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
यंदा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 6 लाख 28 हजार 630 विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. यात पाचवीसाठी 2 लाख 42 हजार 302 तर आठवीसाठी 3 लाख 86 हजार 328 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. राज्यातील 47 हजार 612 शाळांनी परीक्षा साठी नोंदणी केली आहे.

दरम्यान, शासनाकडून ही शिष्यवृत्तीची परीक्षाही रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासनाकडून परीक्षा परिषदेला परीक्षा रद्द करण्याबाबत लवकरच आदेश प्राप्त होतील असे समजते आहे. राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाइन घ्यावी अन्यथा ती परीक्षा रद्द करावी, अशी मागणीही होऊ लागली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा रद्द ऐवजी लांबणीवर टाकणे योग्य ठरणार 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची तयारी सुरु आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचे नियोजन आहे. परीक्षा साठी केंद्र निश्चित करण्याचे काम सद्य स्थितीला सुरु आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या लाभाची महत्वाची परीक्षा आहे. त्यामुळे ती रद्द करणे योग्य ठरणार नाही. परीक्षेसाठी आणखी एक महिना बाकी आहे. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात न आल्यास परीक्षा आणखी पुढे ढकलण्याचा पर्याय निवडता येऊ शकतो, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.