पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी येत्या 25 एप्रिल रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी अखेर परीक्षा परिषदेला मुहुर्त सापडला आहे. परिषदेच्या संकेतस्थळावर अधिसूचना उपलब्ध करून दिली आहे.
दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये घेण्यात येते. यंदा मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर टाकली आहे. परीक्षेबाबतच्या अधिसूचनेविषय पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्याकडून परिषदेकडे वारंवार विचारणा होत होती. परीक्षेसाठी कंपनी नेमण्यात काही महिन्यांचा कालावधी गेला. अखेर विनर सॉफ्टवेअर्सला काम देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिसूचना जाहीर करण्यासही विविध कारणांनी विलंब झालेला होता.
शाळा माहिती प्रपत्र भरणे, ऑनलाइन अर्ज व शुल्क भरणे यासाठी 21 मार्चपर्यंतच मुदत आहे. या मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन अर्ज भरता येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले आहे. शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज https://www.mscepuppss.in संकेतस्थळावर भरावा लागणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांना 20 रुपये, तर बिगरमागास विद्यार्थ्यांना 80 रुपये शुल्क आहे.