जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत मार्गी लावा : जिल्हाधिकारी

नगर – सन 2019-20 च्या जिल्हा वार्षिक योजनेतील कामांच्या तांत्रिक, प्रशासकीय मान्यता संबंधित सर्व यंत्रणांनी तात्काळ प्राप्त करुन घ्याव्या. ज्याठिकाणी निविदा काढायच्या असतील त्यांची प्रक्रिया पूर्ण करावी आणि कामांना सुरुवात करावी. शासन निधी वेळेत खर्च होईल, यादृष्टीने सर्व यंत्रणांनी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज श्री. द्विवेदी यांनी जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजनेच्या विविध यंत्रणांच्या खर्चाचा आढावा घेतला. विशेषता लोककल्याणाच्या योजनांच्या अनुषंगाने यंत्रणांना प्राप्त झालेला निधी त्यांनी वेळेत विकास कामांसाठी वापरावा. त्यासाठीची अनुषंगिक प्रक्रिया पार पाडावी. आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, रस्ते विकास, समाजकल्याण आदी विभागांनी त्यांची कामे विहित वेळेत मार्गी लागण्यासाठी योग्य की कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2019-20 करिता शासनाने मंजूर केलेल्या निधीच्या खर्चाचा आढावा जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी घेतला. ज्या विभागांना निधी मंजूर झाला आहे. मात्र, राज्य स्तरावरुन त्यासाठी संबंधित विभागाकडून निधी मिळणार असेल, तर त्या यंत्रणांनी नियोजन समितीकडे तो निधी समर्पित करावा, जेणेकरुन ज्या यंत्रणांना निधीची आवश्‍यकता असेल, त्यांना तो निधी देण्यात येईल. यासंदर्भातील पुनर्विनियोजन प्रस्तावही सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.