मायणी वन उद्यानात फुलांच्या सप्तरंगांची उधळण

मायणी – मायणी पक्षी आश्रयस्थानामधील वन उद्यान विविधरंगी फुलांनी हबरून गेले आहे. त्यामुळे फुलांच्या सप्तरंगांची उधळण होत असल्याने विलोभनीय दृश्‍य दिसत असून पाहणाऱ्यांचे मन भारावून जात आहे. मात्र, करोनामुळे पर्यटन बंदी असल्याने परिसर ओस पडला आहे.
येथील ब्रिटीशकालीन तलावाशेजारी असलेल्या पक्षी आश्रयस्थानामध्ये वन विभागामार्फत करण्यात आलेल्या उद्यानात देशी- विदेशी विविध जातींची फुलझाडांची रोपे लावण्यात आली आहेत.

या झाडांना सध्या फुलांचा बहर येऊ लागल्याने फुलांच्या सप्तरंगांची उधळण पाहयला मिळत असून हजारो जातीच्या फुलांनी वन उद्यान बहरू लागले आहे. येथील ब्रिटीशकालीन तलाव गेली सलग दोन वर्ष पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. त्यामुळे येथील निसर्ग सौंदर्यात भर पडली असून तलावाशेजारी वनविभागामार्फत छोटे उद्यान तयार केले आहे.

त्या उद्यानांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठीचे साहित्यही बसवण्यात आले आहे. तसेच हजारो जातींची देशी- विदेशी फुलझाडे लावण्यात आली असून या फुलझाडांना विविध रंगीबेरंगी फुले उमलू लागली असल्याने सप्तरंगाची उधळण असल्याचा भास होत आहे. सध्या करोनाचे संकट ओढवल्यामुळे व पर्यटनस्थळांना बंदी असल्याने हा तलाव, वन उद्यान व पक्षी आश्रयस्थान सध्या ओस पडले आहे.

गतवर्षी या वन उद्यानामध्ये काही प्रमाणात फुलझाडे लावण्यात आली होती. यावर्षी वन उद्यानात हजारो देशी- विदेशी जातींची फुलझाडे लावून वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन ही बाग फुलवली आहे. या बागेमध्ये सध्या शेकडो जातींची फुलझाडे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसह पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. याशिवाय वन उद्यानामध्ये चिंच, बाभूळ, शिवरी, रानटी बाभुळ, करंजे, अशोक, करंज, सुरू अशा विविध जातींच्या वृक्षांची हजारो रोपे तयार करण्यात आली आहेत.

पिवळा, पांढरा, गुलाबी… विविधरंगी बहर
मायणी वन उद्यानात सध्या विविधरंगी फुलांचा बहर जोमात येऊ लागला आहे. या फुलांमध्ये केमन पुष्प, सुवर्ण तुषार पुष्प, चाफा पुष्प, घाणेरी पुष्प, लाल जट्रोफा पुष्प, रसना पुष्प, सुदर्शन रक्तपुष्प,कर्दळी पुष्प, कण्हेर पुष्प यांसह विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले बहरू लागली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.