होम साहेब आले, पळा पळा

प्रशांत जाधव
बेशिस्त पोलिसांची घाबरगुंडी; शिस्त न पाळणाऱ्या 163 जणांवर कारवाई

सातारा  – सर्वात शिस्तप्रिय असा लौकिक असणाऱ्या पोलीस दलात सध्या नव्या पिढीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे वेगळाच पायंडा पडताना दिसत आहे. मूळ ध्येयाकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाला स्टाईलमध्ये राहवे असे वाटत आहे. मात्र, हे सगळे पोलीस दलाच्या शिस्तीला धरून नसल्याने पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे यांनी असा “स्टाइल’बाजांना चांगलाच धडा शिकवण्याचा विडा उचलला आहे.

पायाच्या नखापासून ते डोक्‍याच्या केसांपर्यंत सर्व काही पोलीस दलाच्या शिस्तीला धरून पाहिजे, असा अट्टाहास साळुंखे यांचा असल्याने सध्या पोलीस दलात त्यांचा दबदबा तयार झाला आहे. राजेंद्र साळुंखे दिसले तरी पोलीसांच्यात “” होम साहेब आले, पळा पळा” अशी चर्चा ऐकायला मिळते.

महाराष्ट्र पोलीस आणि खासकरून सातारा पोलिसांना मोठा इतिहास आहे. सातारा पोलीस दलाची वास्तू पाहिली तरी या वास्तूने ब्रिटिशांच्या काळापासून शिस्त अन्‌ बाणेदारपणा जपल्याचे लक्षात येते. मात्र, आता काळ बदलला हाफ चड्डीतील पोलीसदादा फुल पॅंटीत आला, पोषाख बदलला तशी काळानुरूप त्यांची कार्यपद्धती बदलली. इथपर्यंत ठीक होते. पण एकविसाव्या शतकातील पोलीसदादांना यापेक्षा वेगळा बदल पाहिजे, जो पोलीस दलाच्या शिस्तीला मान्य नाही. मात्र, सगळं काही सुरळीत सुरू असल्याने तसेच कामाचा व्याप असल्याने बहुदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते.

त्यामुळे सरकारी गणवेशावर जाकीट घालणे, गणवेश सरकारी अन्‌ पायात बुट खासगी, हातात कडे, कपाळाला टिक्का, नाम, केसांची अनोखी स्टाइल केलेले पोलीसदादा नजरेस पडू लागले होते. परिणामी शहरात, गावात, रस्त्यावर ज्या प्रमाणात पोलिसींग दिसायला पाहिजे ते दिसत नसल्याने गुन्हेगारी कृत्यांना एक प्रकारे वाव मिळत होता. तसेच पोलीस दलाच्या शिस्तीला कुठे तरी कमीपणा येताना दिसत असल्याने पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे यांनी पोलीस दलातील अशा स्टाइलबाजांना कारवाईच्या कचाट्यात आणले आहे.

साळुंखे यांनी एका वर्षात तब्बल 163 बेशिस्त कर्मचाऱ्यांना धडा शिकवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या पोलीस दलात वेगळा बदल अनुभवायला मिळत आहे. इच्छा नसली तरी अनेकजण साळुंखे यांच्या आदरयुक्त भीतीपोटी गणवेश, कॅप, शूज हे सगळे पोलीस दलाच्या शिस्तीनुसारच घालताना दिसत आहेत.

यांच्यावर केली कारवाई
गणवेशावर खासगी जर्किन व शूज, विनारायफल कर्तव्य, डोक्‍यावर टोपी न घालणारे, वरिष्ठांना सॅल्यूट न करणारे, डोक्‍यावर आर्मीची टोपी घालणारे, विनापरवानगी साडी घालणाऱ्या व त्यावर जर्किन घालणाऱ्या महिला कर्मचारी, नेमप्लेट नसणारे, बेडिंगचे साहित्य सोबत नसलेले, परेडला गैरहजर व परेडवेळी मोबाइलवर खेळत बसलेले, तक्रार निवारण दिनादिवशीच गैरहजर, तक्रारदाराशी उद्धटपणे वर्तणूक, रात्रगस्तीला झोपणारे, लॉकअप गार्ड ड्युटीवर असताना झोपलेले.

पोलीस निरीक्षकांनाही कारवाईचा दणका
पोलीस मुख्यालयात वेलफेअर शाखेला कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक हे निवडणूक काळात स्ट्रॉंग रूमला बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यावेळी संबंधित निरीक्षक झोपलेले होते तसेच त्यांनी त्यांचे पिस्टल व राऊंड काढून ठेवणे गरजेचे असतानाही तसे न केल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

पोलीस हा कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत रस्त्यावरून ये जा करत असतो. मात्र, त्यावेळी तो वर्दीवरून खासगी जाकीट घालतो. असे करण्याने पोलीस रस्त्यावर असूनही त्याची उपस्थिती दिसून येत नसल्याने गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांचे मनोबल वाढते. वर्दी मिळवण्यासाठी कष्ट करणारे ती मिळाली की तिला कंटाळतात याचे वाईट वाटते. त्यामुळे प्रत्येकाने वर्दीचा मान राखून ती घालायचला पाहिजे तसेच पोलीस दलाची शिस्त पाळून शूज, कॅप नीट घालून आपापली कर्तव्ये प्रमाणिकपणे पार पाडली तर गुन्हे घडतील असे वाटत नाही. त्यामुळे सर्वांनी लोकांचा अन्‌ वर्दीचा मान राखून काम करावे, नेमून दिलेली कर्तव्य नीट पार पाडावीत.
राजेंद्र साळुंखे, पोलीस उपअधीक्षक (गृह)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.