यंदा सोयाबीन बियाणांची भासणार टंचाई

अतिवृष्टीचा गुणवत्तेवर परिणाम; उपलब्ध बियाणे साठवून ठेवण्याचे आवाहन
कराड – जिल्ह्यात गत खरीप हंगामात झालेली अतिवृष्टी, महापूर, अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन बियाणे उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी खरीप हंगाम 2020 साठी शेतकऱ्यांनी उपलब्ध बियाणे व्यवस्थित राखून ठेवण्यासाठी कृषी विभागामार्फत उपाययोजना राबवल्या जात आहेत.

सातारा जिल्ह्यात बहुतांश तालुक्‍यात सोयाबीन पिकाखालील क्षेत्रामध्ये सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे सुमारे 54 हजार हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून खरिपामध्ये मागील तीन वर्षामध्ये जिल्ह्यात सरासरी 69 हजार 100 हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. केंद्र शासनाने सोयाबीन पिकासाठी 35 टक्के बियाणे बदलाचा दर निर्धारित केलेला असून संभाव्य पेरणीचे क्षेत्र व निर्धारित बियाणे बदलाचा दर विचारात घेवून दरवर्षी सोयाबीन बियाणाची गरज निश्‍चित केली जाते. या बियाण्याचा महाबीज, एनएससी, खासगी बियाणे उत्पादक कंपन्या यांच्यामार्फत पुरवठा केला जातो.

गत खरीप हंगामात अतिवृष्टी, महापूर, अवेळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. सन 2020 च्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सोयाबीन बीज उत्पादन क्षेत्रावर उत्पादीत झालेले बियाणे तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील दोन हंगामात प्रमाणित बियाण्याची पेरणी करून उत्पादीत केलेले बियाणे हे पुढील हंगामासाठी राखून व साठा करून ठेवणे गरजेचे आहे.

दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाणांपासून उत्पादीत होणारे सोयाबीन हे बियाणे म्हणून शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. ग्राम बिजोत्पादन, पीक प्रात्यक्षिके, शेतकरी समूह आदी कार्यक्रमांतर्गत उत्पादीत बियाणांचा वापर करावा. प्रमाणित बियाणांपासून उत्पादीत चांगल्या प्रतिच्या बियाणांची चाळणी करून निवड करावी. सोयाबीन बियाणांचे बाह्यावरण नाजूक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपूर्वक करावी.

सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते. त्यामुळे साठवणुकीचे ठिकाण थंड, ओल विरहीत व हवेशीर असले पाहिजे. साठवणुकीसाठी प्लॅस्टिक पोत्याचा वापर करू नये, ज्या शेतकऱ्याकडे सोयाबीन बियाणे उपलब्ध आहे. त्यांनी त्यांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

कृषी विभागाकडून गावोगावी भेटी
यावर्षी सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा जाणवण्याची शक्‍यता असल्याने कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना बियाणांच्या साठवणुकीबाबत आवाहन केले आहे. तसेच चांगल्या बियाणांचा शोधमोहीम करण्यासाठी गावोगावी भेटी दिल्या जात आहेत. पुढील हंगामात सोयाबीनची लागण करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या उत्पादनाची गरज आहे. उत्तम दर्जाचे सोयाबीन बियाणे असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.