मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. स्टेट बँकेनं MCLR दरामध्ये वाढ केली आहे. नवीन दर १५ जुलै २०२४ म्हणजे आजपासूच लागू झाले आहेत. या वाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या कर्जाच्या हप्त्यावर होणार आहे. यामुळे ग्राहकांचा EMI वाढणार आहे.
MCLR दरामध्ये किती झाली वाढ?
MCLR वाढल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचा बेस लँडिंग रेट ८.१० टक्क्यांवरून ९ टक्के झाला आहे. १५ दिवसांच्या कालावधीसाठी MCLR दर ८.१० टक्के झाला आहे. १ महिन्याचा MCLR दर ८.३५ टक्के, ३ महिन्यांचा MCLR दर ८.४० टक्के, ६ महिन्यांचा MCLR दर ८.७५ टक्के आणि १ वर्षाचा MCLR दर ८.८५ टक्के झाला आहे. तर, १ वर्षासाठी हा दर ८.८५ टक्के, २ वर्षांसाठी आणि ३ वर्षांसाठी हा दर अनुक्रमे ८.९५ टक्के आणि ९ टक्के इतका आहे. महिनाभरापूर्वीच स्टेट बँकेनं वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जासाठी एमसीएलआर रेटमध्ये ०.१० टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर लगेचच पुन्हा हे दर ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.
MCLR दर म्हणजे काय?
MCLR दर ही एक प्रकारची किमान व्याजदरावर घातलेली मर्यादा असते. या दरापेक्षा कमी दरानं बँक कोणालाही कर्ज देऊ शकत नाही. २०१६ साली ही पद्धत सुरू झाली. बहुतेक किरकोळ कर्जे, गृहकर्जे आणि वाहन कर्जे MCLR दराशी जोडलेली असतात. त्यामुळं आगामी काळात ईएमआयमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बहुतांश कॉर्पोरेट कर्जांनाही याचा फटका बसणार आहे.
रेपोदरात कोणतीही वाढ नाही
स्टेट बँकेनं MCLR दरामध्ये वाढ केली असली तरी भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.
रेपो दर म्हणजे काय?
रेपोरेट हा व्याज दर आहे ज्यावर भारतीय रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना पैसे कर्ज देते. रेपोरेट पूर्ण फॉर्म म्हणजे पुनर्खरेदी करार किंवा पुनर्खरेदी पर्याय. आरबीआयने सध्याचा रेपो दर 6.50% निश्चित केला आहे.