पुणे – तुझा माज उतरवतो, तुझी विकेट काढतो म्हणत एका तरुणाचा कोयत्याने गळा चिरण्यात आला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे, तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाही जबर मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे जखमी व आरोपी दोघेही बालपणीचे मित्र आहे. ही घटना पाटील इस्टेट येथील सार्वजनिक शौचालयाजवळ घडली.
आकाश नवनाथ हनवल (25, रा.पाटील इस्टेट) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी अक्षय परशुराम पवार (26) आणि त्याच्या बहिणीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश व अक्षय हे दोघेही बालपणीचे मित्र आहेत. दोघे बिगारी काम करुन उदरनिर्वाह करतात. त्याच्यांमध्ये काही दिवसांपुर्वीच किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. दरम्यान रविवारी रात्री दोघाचेही मद्याच्या नशेत पुन्हा वाद झाले. यावेळी अक्षयने रागाच्या भरात घरातून कोयता आणला. हा कोयता हवेत गरागरा फिरवून आकाशला ‘तुला लय माज आला आहे का ? तुझा माज उतरवतो, तुझी विकेटच काढतो, मी पाटील झस्टेटचा दादा आहे म्हणत परिसरात दहशत पसरवली.
यानंतर आकाशच्या दिशेने अक्षय व त्याची बहिण पळत गेली. अक्षयच्या बहिणीने आकाशला मागून घट्ट पकडले, यानंतर अक्षयने आकाशच्या गळ्यावर व कपाळावर धारदार कोयत्याने वार केले. आकाशला वाचावायला दादा दुबळे मध्ये पडले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक साळवी करत आहेत.