पुणे – शहरातील नामांकित महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचा बहाणा करून नागरिकांची तब्बल सव्वाकोटी रुपयांची फसवणूक केली. ही घटना बोपोडी येथे घडली असून याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणी सुहास नारायण ओव्हाळ (रा. क्लासिजम सोसायटी, बोपोडी ) यांनी फिर्याद दिली. त्यावरून मेडवेल कंपनीचा संचालक राहुल यादव व समीर सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सप्टेंबर ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये हा प्रकार घडला. फिर्यादी व आरोपींची तोंडओळख होती. फिर्यादी यांच्या मुलीला एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. त्यावेळी संशयित आरोपींनी फिर्यादीस त्यांची शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये थेट ओळख असून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीही आपण प्रवेश देऊ शकतो, अशी त्यांनी फिर्यादीस बतावणी केली.
फिर्यादीने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मुलीला नामांकीत महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्यासाठी 30 लाख रुपये दिले. तसेच अन्य दोघांकडूनही याच पद्धतीने बतावणी करून त्यांनी त्यांच्याकडूनही मोठी रक्कम उकळली. त्यानंतर मुलीला संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे फिर्यादीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पैसे घेऊनही प्रवेश न मिळाल्यामुळे ओव्हाळ यांनी अखेर पोलिसांकडे दाद मागितली. आरोपींनी फिर्यादी व अन्य पाच जणांकडून 1 कोटी 31 लाख 37 हजार रुपये घेत फसवणूक केली. फिर्याद दाखल झाल्यापासून आरोपी पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल भालेराव करीत आहेत.