पेट्रोल पंपावरून सव्वादोन लाखांच्या डिझेलची चोरी

जामखेड -बीड रोडवरील पेट्रोल पंपावर अज्ञात चोरांनी डीझेलच्या टाकीत पाईप टाकून उपसा करुन, सव्वादोन लाख रुपयांचे 3 हजार 600 लिटर डीजेलची चोरी केली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्याला अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड शहरात सध्या चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. बीड रोडवरील एक खताचे दुकान फोडून चोरांनी सोयाबीन बियाणे चोरुन नेले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी बीड कॉर्नर येथील एक मोबाईलचे दुकान फोडून चोरांनी दहा ते बारा हजारांचा ऐवज लंपास केला होता. वरील दोन्ही घटने प्रकरणी जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर चोरांनी आपला मोर्चा डीजेल चोरीकडे वळवला. जामखेड-बीड रोडवर पेट्रोलपंप मालक विनोद शिवचंद सुराणा यांचा अनेक वर्षांपासून पेट्रोल पंप सुरू आहे. मंगळवारी (दि.18) रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी या ठिकाणी या पेट्रोलपंपाच्या साठवण टाकीत पाईप टाकून 2 लाख 31 हजार 84 रुपयांचे 3 हजार 600 लिटर डिझेल चोरुन नेले.

चोरट्यांनी इतक्‍या शिताफीने डाव साधला, की रात्री असलेल्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनादेखील या गोष्टीचा थांगपत्ता लागला नाही. डिझेल घेऊन चोर पसार झाल्यानंतर सकाळी ही घटना पंप चालकाच्या लक्षात आली. या प्रकरणी पेट्रोल पंप मालक सुराणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरोधात जामखेड पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि नीलेश कांबळे हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.