पुणे-सर्वोत्तम विद्यापीठाच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात अकरावे स्थान मिळविले आहे. गतवर्षी नववे स्थान होते. यंदा मानांकनात दोन क्रमांकांची घसरण झाली असली तरी संशोधनात पुणे विद्यापीठ हे विद्यापीठ गटातून महाराष्ट्रात अव्वल आहे.
“नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क’मध्ये सर्वसाधारण गटातही विद्यापीठचे 20 स्थान असून, त्यातही यंदा एक क्रमांकाने घसरण झाली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री धमेंद्र प्रधान यांनी देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची क्रमवारी गुरुवारी जाहीर केली. त्यात देशातील शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक पायभूत सुविधा, अध्ययन-अध्यापन, सोयीसुविधा, संशोधन, विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या रोजगारसंधी, एकूण दृष्टिकोन, उपाययोजना आदी निकषांवरील संस्थांची कामगिरी विचारात घेऊन ही क्रमवारी जाहीर केली जाते.
“एनआयआरएफ’ने सर्वसाधारण, विद्यापीठ, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, महाविद्यालये, मेडिकल, लॉ, आर्किटेक्चर, डेंटल या क्षेत्रांत क्रमवारी जाहीर केली आहे. यंदा नव्याने रिसर्च या गटाचा समावेश केला आहे.
यंदाच्या देशाच्या सर्वोत्तम विद्यापीठ क्रमवारीत पुणे विद्यापीठाचे आलेख खालावले आहे. यंदा पहिल्यांदाच क्रमवारीत रिसर्च गटात पुण्यातील आयसर संस्थेने 16 वे स्थान, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 37 वे स्थान मिळविले आहे. संशोधनात महाराष्ट्रातून आयआयटी मुंबई (3), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (10), होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट मुंबई (13), पुणे आयसर (16), इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (21), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (37) या संस्थांना समावेश आहे.
- विद्यापीठ गटातील शैक्षणिक संस्था
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – 11
- इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई – 15
- होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट मुंबई – 18
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई – 37
- सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, पुणे – 38
- डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे – 49
- नरसी मूनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई – 5
- दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा – 61
- भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे – 68
- मुंबई विद्यापीठ – 71
- पद्माश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, मुंबई – 72
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद – 76