41 हजार 547 विद्यार्थ्यांची सराव परीक्षेकडे पाठ

1 लाख 10 हजार 17 विद्यार्थ्यांपैकी 68 हजार 470 जणच उपस्थित

 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली जात आहे. सोमवारी 1 लाख 10 हजार 17 विद्यार्थ्यांनी ती देणे अपेक्षित होते. मात्र, केवळ 68 हजार 470 जणांनीच दिल्याचे समोर आले आहे. जवळपास 41 हजार 547 विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेकडे पाठ फिरवली आहे.

पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमधील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची परीक्षा 10 एप्रिलपासून घेतली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा देण्यापूर्वी विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवस परीक्षेच्या सरावाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षा देताना कोणत्या अडचणी येऊ शकतात याची माहिती विद्यार्थ्यांना होणार आहे. पहिल्याच सराव परीक्षेत जवळपास 40 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली नसल्याचे दिसून येत आहे.

सोमवारी विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची सराव परीक्षा झाली. त्यात पदवी अभ्यासक्रमाच्या 88 हजार 866, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या 18 हजार 235 आणि पदविका अभ्यासक्रमाच्या 2 हजार 916 विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात पदवीच्या 54 हजार 107, पदव्युत्तर पदवीच्या 12 हजार 527 आणि पदविका अभ्यासक्रमाच्या 1 हजार 836 विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली.

परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी

सुमारे 350 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सराव परीक्षेचा पासवर्ड न मिळणे, ई-मेल आयडी व मोबाइल रजिस्टर्ड न होणे अशा अडचणींचा सामना करावा लागला. काही विद्यार्थ्यांची उत्तरे सेव्ह होत नव्हती. त्यामुळे या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करावी, अशी मागणी काही विद्यार्थ्यांकडून होत आहे. तसेच हेल्पलाइन क्रमांकावर कोणीच कॉल उचलत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.