पाच वर्षांपासून प्रतीक्षा; शासकीय कार्यालयांचे बस्तान; सावित्रीबाईंचा जीवनपट कधी उलगडणार?
स्मारकातील विविध प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यावीत. त्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवावी. कार्यालयांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना तत्कालीन महापौर राहुल जाधव यांनी जून महिन्यात दिल्या होत्या. पुढील पाच महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे नियोजन त्या वेळी ठरले होते. पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर सद्य:स्थितीत केवळ निविदा उघडण्यात आली आहे. पुढील कार्यवाही प्रलंबित आहे. शासकीय कार्यालये देखील हलविलेली नाही.
स्मारकात सध्या पहिल्या मजल्यावर महापालिकेचा क्रीडा विभाग सुरू आहे. क्रीडा विभागाला पर्यायी जागा अद्याप उपलब्ध झालेली नाही. मासुळकर कॉलनीतील तांत्रिक शाळा इमारतीमध्ये यापूर्वी हा विभाग कार्यरत होता.
दरम्यान, चिंचवडगाव येथील झोपडपट्टी पुनर्वसन आणि निर्मूलन विभागाच्या कार्यालयात क्रीडा विभागाचे स्थलांतर करण्याचे नियोजित आहे. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील इमारतीत दुसऱ्या मजल्यावर हा विभाग स्थलांतरीत करण्याची मागणी क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे. त्याशिवाय, स्मारकाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर स्थापत्य विभागाचा अभिलेख कक्ष आहे. तर, तिसऱ्या मजल्यावर राज्य सरकारचा नगररचना आणि मुल्यनिर्धारण विभाग कार्यरत आहे. संबंधित विभाग देखील अन्यत्र हलविण्याचे काम बाकी आहे.
काय असणार स्मारकात?
पुण्यातील ब्रिटीश लायब्ररीच्या धर्तीवर साकारणार मध्यवर्ती ग्रंथालय
दृकश्राव्य माध्यमातून दोन दालनांमध्ये उलगडणार
सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचा जीवनपट
महिलांच्या व अन्य सामाजिक कार्यक्रमांसाठी मोकळा हॉल
स्मारकातील नियोजित कामांसाठी गेल्या आठवड्यात निविदा उघडण्यात आली आहे. निविदा स्वीकृती कार्यवाही सुरू आहे. स्थायी समितीची मंजुरी घेतल्यानंतर प्रत्यक्ष कार्यादेश देऊन कामाला सुरूवात होईल.
– ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता.
सावित्रीबाई फुले स्मारकातील शासकीय कार्यालये लवकरात लवकर अन्यत्र स्थलांतरित करायला हवीत. ज्या उद्देशाने स्मारकाची उभारणी झाली तो उद्देश पूर्ण व्हायला हवा. स्मारकात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची म्युरल्स लावून त्यांचा जीवनपट उलगडला पाहिजे.
– आनंदा कुदळे, सदस्य, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती.