पुणे – शहराच्या पूर्वभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड योजना राबवली जात आहे. या धरणापासून पाणी आणण्यासाठी महापालिकेने गुरुत्त्वाकर्षणाचा नियम आणि डोंगर उताराचा फायदा घेतला. त्यामुळे महापालिकेचे तब्बल 200 कोटी रुपयांची बचत झाली आहे. सुमारे 8 किलोमीटर 1,700 मिमी व्यास आणि तब्बल 34 किलोमीटर 1,600 मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांमधून हे पाणी पुण्यात आणण्यात आले असले, तरी या सर्व अंतरात फक्त एक पंपिंग स्टेशन उभारावे लागल्याने ही बचत झाली आहे.
भामा-आसखेड धरणातून सुमारे 2.62 टीएमसी पुणे शहरासाठी आणण्यात आले आहे. यासाठी चाकण येथे 10 एकर जागेत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. तेथे धरणातून पाणी येत आहे. यासाठी महापालिकेने गुरुत्वाकर्षणाचा जास्तीत जास्त वापर करत जलवाहिनीची खोली आणि जलशुद्धीकरण केंद्राची जागा निश्चित केली. त्यामुळे सुमारे 42 किमी अंतरात पालिकेला वाकी तर्फे वाडा गावातील जॅकवेलपासून पाणी उचलून करंजविहिरे येथील पंपिंग स्टेशनपर्यंत आणावे लागले आहे. तेथून ते पंपिंगद्वारे चाकण येथे आणि पुढे नगर रस्त्यापर्यंत पाणी पुरवठा टाक्यांपर्यंत सुमारे 70 किलोमीटर हे पाणी “ग्रॅव्हिटी लाइन’द्वारे आणण्यात आले आहे.
अशी झाली बचत
सध्या नगर रस्ता परिसरास खडकवासला धरणातून पाणी पुरवठा होतो. त्यासाठी खडकवासला धरणातून पर्वती जलकेंद्रात पाणी आणले जाते. तेथे पुन्हा पंपिंग करून ते टाक्यांमध्ये घ्यावे लागते. तेथून पंपिंगद्वारे होळकर जलकेंद्र आणि पुढे नगर रस्ता परिसरात पाणीपुरवठा करावा लागतो. महापालिकेने भामा- आसखेड प्रकल्पासाठी उताराचा फायदा घेतला नसता, तर पुण्यापर्यंत पाणी आणण्यासाठी सुमारे तीन ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारावी लागली असती. त्यासाठी जागा, बांधकाम तसेच यंत्रसामग्रीसाठी तब्बल 200 कोटींचा भार सहन करावा लागला असता. शिवाय वर्षाला पाच कोटींचे वीज बिल मोजावे लागले असते.
मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता, प्रकल्प प्रमुख युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता सुदेश कडू व मनीषा शेकटकर या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची जबाबदरी सांभाळली.
भामा-आसखेड योजनेत गुरुत्वाकर्षण आणि डोंगर उताराचा फायदा घेण्यात आला. जलवाहिनी टाकताना नियोजन करण्यात आले.परिणामी, एवढ्या मोठया प्रमाणात पाणी आणण्यासाठी केवळ एक पंपिंग स्टेशन उभारावे लागले. त्यामुळे नगररस्ता परिसरातील पाण्याच्या टाक्यांनाही हे पाणी सहज पोहचणार आहे.
– प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, मनपा