मुंबई – महंमद सिराजला झालेली दुखापत व वॉशिंग्टन सुंदरला झालेली करोनाची बाधा यामुळे जयंत यादव व नवदीप सैनी यांना भारताच्या एकदिवसीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात आता हेच दोन बदल करण्यात आले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत सिराजला दुसऱ्या कसोटीत पायाचे स्नायू दुखावल्याने दुखापत झाली होती, तर वॉशिंग्टन सुंदरला करोनाची बाधा झाल्यामुळे त्याला या मालिकेतून माघार घ्यावी लागत आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल
येत्या बुधवारपासून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 19, तर दुसरा 21 आणि तिसरा सामना 23 तारखेला होणार आहे.
या मालिकेसाठी भारताचा एकदिवसीय संघ येथे दाखल झाला असून, पुढील तीन दिवस संघ करोनाच्या नियमानुसार विलगीकरणात राहणार आहे. हा कालावधी संपल्यावर खेळाडूंना सरावाची परवानगी मिळणार आहे.