पार्ल – सलामीवीर लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली आज भारतीय संघ यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणार आहे. कसोटी मालिका गमावल्यानंतर या सामन्यात भारतीय संघ नवा गडी नवा डाव असा मैदानात उतरणार आहे.
भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका
स्थळ – बोलॅंड पार्क, पार्ल
वेळ – दुपारी 2 वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस 1, 2
मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी खरेतर रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले गेले आहे मात्र, तो दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नसल्याने राहुलकडे संघाची धूरा सोपवण्यात आली आहे. तसेच प्रमुख फलंदाज विराट कोहली देखील कर्णधारपद सोडल्यानंतर पहिल्यांदाच नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणार आहे.
कसोटी मालिकेत पराभवाचा सामना केलेल्या भारतीय संघात एकदिवसीय सामन्यांसाठी अनेक बदल झाले आहेत. हा संघ कागदावर तरी बलाढ्य वाटत आहे. कर्णधार राहुल, रूतूराज गायकवाड, शिखऱ धवन, इशान किशन असे अनेक पर्याय सलामीच्या जागेसाठी संघाकडे आहेत. तसेच मधल्या पळीत खुद्द कोहली असून सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर व यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अशी तगडी फलंदाजी भारताकडे आहे. तसेच शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, महंमद सिराज व रवीचंद्रन अश्विन अशी चांगली गोलंदाजीही आहे.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ काही नवख्या खेळाडूंसह खेळत असला तरीही त्यांना घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ होणार आहे. एडन मार्करम, डेव्हीड मिलर, टेंबा बवुमा, रुसी वॅन दर दुसेन व क्वांटन डीकॉक अशी भक्कम फलंदाजी असून त्यांना रोखण्याचे आव्हान भारताच्या गोलंदाजांसमोर राहणार आहे. भारताला तोडीसतोड अशी कागिसो रबाडा, वेन पार्नेल, केशव महाराज, आंदेल फल्कवायो अशी तगडी गोलंदाजी असल्याने केवळ हाच सामना नव्हे तर तिन सामन्यांची ही मालिका रंगतदार ठरेल.