नगर – जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी असलेल्या आयुष हॉस्पीटल उभारणीला विरोध करत क्रीडांगण बचाओ आंदोलनात विद्यार्थ्यांसह पालकांनी सहभाग घेत सोमवारी (दि.16) रोजी आंदोलन केले. सेंट विवेकानंद शाळेशेजारील ही जागाच राज्य सरकारची आहे.
या जागेत केंद्र शासनाचे आयुष हॉस्पिटलचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. मात्र, या प्रकल्पाला शाळा प्रशासन, शिक्षक, पालकांनी विरोध केला आहे. या जागेत आयुष हॉस्पिटल झाल्यास शाळेसाठी मैदानच उरणार नाही, अशी भूमिका विद्यार्थी, पालक व अन्य राजकीय पक्षांनी घेतली. त्यामुळे आयुष’ ला विरोध करण्यासाठी शाळा प्रशासन व पालकांसह भाजप-शिवसेना नेत्यांनी मैदान बचाओ आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी खा. डॉ. सुजय विखे हे आयुष हॉस्पिटलचे भूमिपूजन करण्यासाठी आले होते. विद्यार्थी, पालकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी माजी खासदार दिलीप गांधी यांनी सुचविलेल्या या जागेत हॉस्पिटल उभारणीस स्थानिक शाळा प्रशासन, मुलांचे पालक तसेच शिवसेना व भाजपमधील एका गटाने विरोध दर्शविला आहे. त्यावरुन हॉस्पिटल उभारणीला राजकीय रंग प्राप्त झाला आहे.
दरम्यान, माजी आमदार अनिल राठोड, नगरसेवक योगीराज गाडे, महापालिकेतील भाजपचे गटनेते स्वप्निल शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड. अभय आगरकर, शहर सरचिटणीस अमित गटणे, नाट्यकर्मी अमोल खोले, कलाकार ज्ञानेश शिंदे आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.