राजगुरूनगर -खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे बाळासाहेब आमले यांच्यावर कारवाई करावी व मला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी रविवारी (दि. 9) खेड पोलीस ठाण्यात समक्ष येऊन लेखी तक्रार केली आहे.
खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले नेमणूक झाल्यावर तालुक्यातील अनेक गावात अवैध कामे करीत आहेत. जमिनीच्या नोंदी, दाखले, रेशनकार्ड आदींसाठी तलाठी, सर्कल यांच्या माध्यमातून नागरिकांची अडवणूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करीत आहेत. तहसीलदार यांच्या या मनमानी कारभाराबाबत अनेक गावातील सरपंच, प्रतिनिधी व नागरिकांनी तक्रारी केल्यावर लोकप्रतिनिधी या नात्याने आपण चौकशी सुरू केली.
मात्र, हे केल्यावर तहसीलदारांचे पती बाळासाहेब आमले यांनी विरोधकांकडे माझ्या जीवाला धोका करण्याची थेट वक्तव्य केली. त्यांच्याशी माझा थेट संपर्क आलेला नाही. माझे काही बरेवाईट झाल्यास तहसीलदार सुचित्रा आमले व त्यांचे पती बाळासाहेब आमले यांना जबाबदार धरावे, असेही आमदार मोहिते पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.