सावरकर राष्ट्रद्रोही, संसदेत तैलचित्रालाही विरोध : राम नाईकांचा काँग्रेसवर पलटवार

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबद्दल कॉंग्रेसला विरोध नाही, त्यांच्याबद्दल आदरच आहे… या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याला भाजपचे ज्येष्ठ नेते व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल यांनी आक्षेप घेतला आहे.

मनमोहन सिंग यांना सावरकरद्वेषाचा विसर पडला कि त्यांचा धृतराष्ट्र झाला, असा संतप्त सवाल करतानाच संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकर यांच्या तैलचित्राचे अनावरण कार्यक्रमावर कॉंग्रेसने बहिष्कार टाकला होता. सावरकर राष्ट्रद्रोही असल्याने संसदेत त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करू नका, असे पत्रच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींना लिहिले होते, असा गौप्यस्फोट राम नाईक यांनी केला.

राज्यात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर भाजपने आपल्या जाहिरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केले होते. गुरूवारी मुंबईत एका कार्यक्रमानिमित्त माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आले असता त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले. सावरकर यांच्याबद्दल कॉंग्रेसला आदर आहे. कॉंग्रेसचा विरोध त्यांच्या हिंदुत्वावादी विचारसरणीला आहे, तो आजही आहे. त्यांच्या या वक्तव्याला हरकत घेत माजी राज्यपाल व भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मनमोहन सिंग व कॉंग्रेसवर टिकेची झोड उठवली. ते म्हणाले, कॉंग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कसा अपमान करते हे जनतेच्या लक्षात आहे. त्यासाठी जनता कॉंग्रेसला कधीच माफ करणार नाही.

डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेचे विरोधी पक्षनेते असताना 26 फेब्रुवारी 2003 रोजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांच्या तैलचित्राचे अनावरण झाले होते. त्यावेळी कॉंग्रेसने त्या कार्यक्रमावर अधिकृतपणे बहिष्कार घातला होता. एवढेच नव्हे तर त्यावेळी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सावरकर राष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे तैलचित्राचे अनावरण करू नका, केले तर कॉंग्रेस खासदार या कार्यक्रमाला येणार नाहीत, असे लेखी पत्रच सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींना लिहिले होते, असे राम नाईक यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसच्या या सावरकर द्वेषात त्यावेळचे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते डॉ.मनमोहन सिंग हेही सहभागी होते. पण त्यांना त्याचा सोयीस्कर विसर पडलेला दिसतोय, असा टोलाही त्यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.