राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ठिय्या आंदोलनानंतर महापालिका आयुक्तांचे लेखी आश्वासन
नगर: सावेडी कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कचरा डेपो स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महापालिकेत ठिय्या देण्यात आला. या आंदोलनानंतर कचराडेपो एक महिन्यात इतरत्र हालविण्यात येईल असे, लेखी आश्वासन महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी आमदार संग्राम जगताप यांना दिले.
सावेडीच्या कचरा डेपोप्रश्नी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने सोमवारी (दि.10) रोजी दुपारी महापालिका कार्यालयात आयुक्त दालनासमोर आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी गटनेते संपत बारस्कर, नगरसेविका दीपाली बारस्कर, विना चव्हाण, डॉ. सागर बोरुडे, कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे, माजी शहराध्यक्ष माणिक विधाते, उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, प्रा. अरविंद शिंदे, बाळासाहेब बारस्कर, माजी उपमहापौर दीपक सुळ, अजिंक्य बोरकर, सतीष बारस्कर, संभाजी पवार, अमोल गाडे, शिवाजी चव्हाण, साहेबान जहागिरदार, वैभव ढाकणे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष सुरेश बनसोडे, प्रशांत भालेराव, अविनाश घुले, अभिजित खोसे, सारंग पंधाडेसह प्रभाग 1 व 2 मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी आ. जगताप म्हणाले की, सावेडी या ठिकाणी कचऱ्यातून खत निर्मीती प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु मागील सत्ताकाळात सत्ताधाऱ्यांनी तेथे कचरा डेपो तयार केला. त्यांना माळीवाड्यातील कचरा रॅम्पही हलविता आला नाही. चांगल्या कामात खोडा घालण्याचे काम त्यांनी शहरात केलेले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या कचरा डेपोमुळे मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
तसेच मागील सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराकडून आर्थिक देवाण-घेवाण केल्यानेच हा प्रश्न निर्माण झाला. महापालिकेने बुरुडगाव तसेच सावेडी हे दोन्ही कचराडेपो शहराबाहेर 10 कि.मी. लांब हलवावेत अशी मागणीही केली आहे. तसेच खत प्रकल्पाचा ठेका देताना महापालिकेने केलेल्या करारनाम्यातील अट क्रमांक 34 व 37 चा ठेकेदाराने भंग केलेला आहे. त्याठिकाणी संरक्षण भिंत बांधणे तसेच सुरक्षारक्षक नेमण्याची जबाबदारी ठेकेदाराची होती परंतु त्याने ती पाळली नाही. स्वत:च्या फायद्यासाठीच ठेकेदारानेच ही आग लावल्याचा संशय असून याची सखोल चौकशी करुन ठेकेदारावर गून्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांनी केली.
ठेकेदार व अधिकारी यांचे साटेलोटे : संपत बारस्कर
या कचराडेपोत खत निर्मिती प्रकल्पासाठी ज्या ठेकेदाराला ठेका देण्यात आला आहे. त्याचे व अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे. त्यामुळे त्यांनीच डेपोला आग लावल्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात शिवसेनेनेच आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी कचराडेपो आणला असल्याचा आरोप यावेळी गटनेते संपत बारस्कर यांनी केला.
पर्यायी जागेचा शोध सुरू : आयुक्त भालसिंग
या आंदोलनानंतर आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी तेथे येऊन आ. जगताप यांच्याशी चर्चा केली. सावेडीतील कचराडेपो हलविण्यासंदर्भात पर्यायी सरकारी जागेचा शोध सुरू असून, लवकरच सदर जागा निश्चित करून सावेडीचा कचराडेपो त्याठिकाणी हलविण्यात येईल, असे लेखी आश्वासन यावेळी आयुक्त भालसिंग यांनी आ. संग्राम जगताप यांना दिले.