सौरभ, ऋतुपर्णा उपउपान्त्यपूर्व फेरीत

रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

व्लाडिव्होस्टॉक: सौरभ वर्मा आणि राष्ट्रीय विजेती ऋतुपर्णा दास यांच्यासह सहा भारतीय खेळाडूंनी येथे सुरू झालेल्या रशिया ओपन टूर सुपर-100 बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीच्या उपउपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. परंतु व्हाईट नाईट्‌स स्पर्धेतील उपविजेत्या अजय जयरामसह गुरुसाई दत्त आणि पारुपल्ली कश्‍यप या प्रमुख खेळाडूंसह प्रतुल जोशी, चिराग सेन, राहुल यादव, बोधित जोशी, वैदेही चौधरी व साई उत्तेजिता राव या भारतीय खेळाडूंचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आल्यामुळे भारतासाठी आजचा दिवस संमिश्र यशाचा ठरला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुरुष एकेरीत आठव्या मानांकित सौरभ वर्माने भारताच्या राहुल यादवचा 23-21, 21-11 असा 35 मिनिटांत पराभव करून उपउपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. तसेच सिद्धार्थ प्रताप सिंगने भारताच्याच बोधित जोशीचा 21-8, 21-14 असा केवळ 19 मिनिटांत फडशा पाडताना आगेकूच केली. महिला एकेरीत ऋतुपर्णा दासने रशियाच्या व्हिक्‍टोरिया स्लोबोदिन्युकचा 21-11, 21-18 असा पराभव केला.

सातव्या मानांकित मुग्धा आग्रेने मलेशियाच्या लिन फुन लिम हिचा 21-16, 21-19 असा 34 मिनिटांत पराभव करीत उपउपान्त्यपूर्व फेरी गाठली. तसेच वृषाली गुम्माडीनेही रशियाच्या एलेना कोमेन्ड्रोव्हस्कायाचे आव्हान 21-11, 21-16 असे 28 मिनिटांत संपुष्टात आणताना आगेकूच केली. पुरुष दुहेरीत भारताच्या अरुण जॉर्ज व सन्यम शुक्‍ला या जोडीने व्लादिमीर निकुलोव्ह व आर्टेम सेर्पियोनोव्ह या स्थानिक जोडीचा 21-15, 21-15 असा पराभ” करीत आगेकूच केली.

गेल्याच आठवड्यांत व्हाईट नाईट्‌स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या अजयने पहिल्या फेरीत कॅनडाच्या झियाओडॉंग शेंगचा सहज पराभव केला होता. परंतु भारताच्याच पाचव्या मानांकित शुभंकर डे याने अजयचे आव्हान 15-21, 21-14, 21-15 असे 46 मिनिटांत संपुष्टात आणताना उपउपान्त्यपूर्व फेरी गाठली. भारताच्या चिराग सेनने दुसऱ्या फेरीत स्पेनच्या अग्रमानांकित पाब्लो ऍबियनला कडवी झुंज दिली. परंतु ऍबियनने अखेर 21-14, 16-21, 21-16 अशी 54 मिनिटांत बाजी मारली.

जपानच्या रयोतारा मारुओने पारुपल्ली कश्‍यपचा 21-12, 21-11 असा केवळ 34 मिनिटांत धुव्वा उडविला. तर प्रतुल जोशीनेही इस्रायलच्या तृतीय मानांकित मिशा झिबरमनविरुद्ध 51 मिनिटे झुंज दिल्यानंतर 12-21, 21-18, 13-21 असा दुसऱ्या फेरीत पराभव पत्करला. मिथुन मंजुनाथने बेल्जियमच्या इलियास ब्रॅकेवर 21-14, 21-13 अशी मात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)