जांबुत : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये मध्ये पिंपरखेड (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी सौम्या सुनिल वरे हिची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या परीक्षेत सौम्याने उत्तम यश संपादन केले. तिच्या यशामागे मुख्याध्यापक पी. सी. बारहाते आणि वर्गशिक्षक लहू गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले. दरवर्षी भारत सरकारकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत हजारो विद्यार्थी सहभागी होत असतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत CBSE अभ्यासक्रमानुसार मोफत शिक्षण, निवास व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. पुणे जिल्हातील शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात सौम्या पुढील शिक्षण घेणार आहे. तिच्या या यशाबद्दल पिंपरखेड ग्रामस्थ तसेच परिसरातून तिचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे.