रियाध – सौदी अरेबियाने आपल्या पुरुषांना पाकिस्तान, बांगलादेश, चाड आणि म्यानमारमधील महिलांशी लग्न करण्यास बंदी घातली आहे, अनधिकृत माहितीनुसार या चार देशांमधील सुमारे 5 लाख महिला सध्या सौदी अरेबियामध्ये रहात आहेत. मात्र आता सौदीतील ज्या पुरुषांना विदेशी महिलेशी विवाह करायचा असेल, त्यांच्यावर कडक निर्बंध घातले जाणार आहेत. विदेशी महिलांशी विवाह करण्यापूर्वी अतिरिक्त औपचारिकतांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतरच सौदीतील पुरुषांना विदेशी महिलेबरोबर विवाहाची परवानगी मिळू शकणार आहे.
ज्यांना परदेशी महिलांशी विवाह करायचा आहे त्यांनी आधी सरकारची संमती घ्यावी लागणार आहे आणि अधिकृत मार्गाने विवाहासाठीचा अर्ज दाखल करावा लागणार आहे, असे मक्काचे पोलिस महासंचालक मेजर जनरल असफ अल-कुरेशी यांनी म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त पाकिस्तानातून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले आहे.
घटस्फोटित पुरुषांना घटस्फोटाच्या सहा महिन्यांच्या आत अर्ज करण्याची परवानगी दिली जाणार नाही. अर्जदारांचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि त्यांनी स्थानिक जिल्हा महापौरांनी स्वाक्षरी केलेले ओळखपत्र तसेच त्याच्या फॅमिली कार्डाची प्रत असलेली इतर ओळखपत्रे जोडावीत, असे कुरेशी म्हणाले.
जर अर्जदार आधीपासून विवाहित असेल तर त्याची पत्नी एकतर दिर्घ आजाराने ग्रस्त आहे किंवा तिचे निर्बिजीकरण झाले असल्याचे दर्शवणारा रुग्णालयाचा एक अहवाल त्याने द्यायला हवा असेल, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र पाकिस्तान, बांगलादेश, चाड आणि म्यानमार या देशांमधील स्त्रियांबरोबर विवाहाला कोणत्या कारणामुळे हरकत घेण्यात आली अहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.