“एलपीजी’ची दोन जहाजे पुढील आठवड्यात भारतात येणार
नवी दिल्ली – सणासुदीच्या पार्श्वभुमीवर सौदी अरेबियाकडून स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य शक्यता टाळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीकडून भारताला अतिरिक्त “एलपीजी’चा पुरवठा केला जाणार आहे.
सौदी अरेबियातील क्रूड तेलाच्या विहीरींवर अलिकडेच मोठे ड्रोन हल्ले झाले आहेत. पण त्यामुळे सौदीच्या तेल पुरवठ्यावर काहीही परिणाम झालेला नाही. मात्र “एलपीजी’च्या पुरवठ्यावर मात्र परिणाम झाला आहे. ड्रोन हल्ल्याच्या दिवशी झालेले दिवसाला 5 दशलक्ष बॅरल तेलाचे नुकसान भरून काढण्यासाठी सौदी अरेबियाने “एलपीजी’ची किमान दोन मालवाहू जहाजे पाठवणे पुढे ढकलले आहे. त्यामुळे “युएई’कडे तातडीने “एलपीजी’ची मागणी करण्यात आली. त्यानुसार “युएई’चे राज्यमंत्री आणि ऍडनॉक समुहाचे मुख्य कार्यकारी डॉ. सुल्तान् अहमद अल जबर यांनी 2 जहाजे पाठवून देण्यास मान्यता दिली आहे. ही जहाजे पुढील आठवड्यात भारतात पोहोचतील, असे तेल मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
युएई ऍडनॉकचे हे तत्पर पाऊल आमच्या व्यापक भागीदारीला आणखी सामर्थ्य देतील. संयुक्त अरब अमिरातीसारख्या महत्त्वाच्या भागीदाराबरोबर हायड्रोकार्बनच्या गुंतवणूकीला बळकट करण्यासाठी एकत्र काम करण्याची अपेक्षा करत असल्याचेही प्रधान म्हणाले. प्रधान यांनी गेल्या आठवड्यात सौदीचे युवराज अब्दुल अझीझ बिन सलमान यांच्याशी तेलपुरवठा करण्याच्या योजनेवर चर्चा केली होती.
भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा तेल पुरवठादार असलेला सौदी अरेबियाकडून दरमहा सुमारे 2 दशलक्ष टन क्रूडची विक्री होते. त्यापैकी सप्टेंबर महिन्यातील 1.2 ते 1.3 दशलक्ष टन पुरवठा यापूर्वीच घेण्यात आला आहे आणि उर्वरित क्रूडबाबत देखील आश्वासन देण्यात आले आहे.