नवी दिल्ली – तेलसाठ्यामुळे समृद्ध बनलेल्या सौदी अरबने भविष्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. निर्धारित तेलसाठ्यांमुळे अशी योजना करणे आवश्यकच होते. सौदी अरबचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी नियोम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत शून्य कार्बन उत्सर्जनचे शहर बनविण्याचे निश्चित केले आहे. या शहरात कार किंवा रस्ते राहणार नसून कार्बन उत्सर्जन होणार नाही.
तब्बल 170 किमीमध्ये तयार होणार या प्रकल्पाला ‘दी लाईन’ हे नाव देण्यात आले आहे. यासाठी 500 अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षीत आहे. नियोम शहराच्या माध्यमातून सौदी अरब तेलसाठे संपल्यानंतरच्या भविष्याची योजना बनवत आहे. प्रिन्स क्राउन सलमान यांनी रविवारी या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रिन्स सलमान म्हणाले की, नव्या शहरात शून्य कार, शून्य रस्ते आणि शून्य कार्बन उत्सर्जन होईल. या शहरात 10 लाख लोक राहू शकतील. यामध्ये शाळा, रुग्णालय आणि सगळीकडे हिरवळ असेल. शहर निर्मितीला याच वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुरुवात होणार आहे.
नियोजित नियोम शहरामध्ये उच्च दर्जाची आणि गतीमान सार्वजनिक परिवहन व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. यामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्सची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. हे शहर 100 टक्के स्वच्छ उर्जेद्वारे संचलित राहणार आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त जीवन जगता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या शहरात युवकांना 3 लाख 80 हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सौदी अरब कच्चे तेल निर्यात करणारा प्रमुख देश आहे. मात्र तेलसाठे कधी तरी संपणार आहेत. त्यामुळे नियोम शहराच्या निर्मितीतून सौदी अरब भविष्याची तजवीज करत आहे. तसेच सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या शहरांमध्ये सौदी शहराचा समावेश आहे. नियोमच्या मदतीने सौदीला प्रदूषणमुक्त होता येणार आहे.