रियाध – सौदी अरेबियातील दहशतवाद विरोधी अधिकाऱ्याने सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा खटला अमेरिकेत दाखल केला आहे. अमेरिकेत आणि कॅनडामध्ये आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप साद अल्जाबरी या सौदीच्या माजी गुप्तहेर प्रमुखाने केला आहे. अनेक वर्षे परदेशात राहिल्यानंतर अल्जाबरी यांनी युवराजांवर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यासाठी हा खटला दाखल केला आहे.
आपल्याला सौदीमध्ये परत आणण्यासाठी युवराजांनी आपल्या दोन मुलांना सौदीमध्ये ताब्यात घेतले आहे. राजघराण्याशी संबंधित न्यायालयाचे कामकाज कसे चालते आणि राजघराण्याच्या नेतृत्वाबद्दलची गोपनीय माहिती आपल्याला माहीत असल्याने आजही आपल्याला ठार मारण्याचे कट रचले जात असल्याचे अल्जाबरी यांनी म्हटले आहे.
सौदी राजघराण्याचे टीकाकार जमाल खाशोगी यांच्या हत्येनंतर विदेशात गेलेल्या सौदीच्या नागरिकांना बळजबरीने परत मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. तुर्कीमध्ये सौदीच्या दूतावासात खाशोगी यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात त्यांची हत्या करण्यात आली होती.
मात्र, त्यांना परत आणण्याच्या प्रयत्नांबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे युवराजांनी म्हटले होते. मात्र, विदेशी गुप्तचरांनी आणि अमेरिकेनेही खाशोगी यांच्या हत्येसाठी युवराजांनाच जबाबदार धरले होते.
सौदीतील पूर्वीचे युवराज मोहंम्मद बिन नायेफ यांना पायउतार व्हायला लागल्यानंतर अल्जाबरी गुपचूप तेथून निसटले होते. मोहंम्मद बिन नायेफ यांना 2017 मध्ये युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी गृहमंत्रीपदावरून खाली खेचून सत्ता हाती घेतली होती. सलमान यांनी अन्य काही चुलत आणि सावत्र भावंडांना ताब्यात घेतले होते.